सेल्फीच्या नादात शाळकरी मुलगा पाण्यात बुडाला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेल्फी काढणे एका शाळकरी मुलाच्या जीवावर बेतले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात १० वी मध्ये शिकणारा मुलगा खाडीत पडून बुडाल्याची घटना घडली आहे. डोंबिवली परिसरात ही घटना घडली असून अभिनव झा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

अभिनव मित्रांसोबत वसई – पनवेल रेल्वे मार्गावरील खाडीवरील पुलावर फिरायला गेला होता. यावेळी सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाडीत पडला आणि बुडाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा शोध घेतला मात्र अंधार पडल्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले आहे.

डोंबिवली पश्चिमेस राहणारा अभिनव आणि त्याचे मित्र ट्यूशन क्लासमधली परीक्षा रद्द झाल्याने फिरायला गेले होते. वसई-पनवेल रेल्वेमार्गावरील खाडी पुलावर मित्रांसोबत मस्ती करताना सेल्फी काढण्याच्या नादात तो खाडीत पडला. त्यामुळे घाबरलेल्या मित्रांनी त्याच्या घरी जाऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीनं खाडीत शोधकार्य सुरू केले. मात्र अभिनवचा शोध लागला नाही. अभिनव खाडीत नेमका कसा पडला, या प्रकरणी डोंबिवली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.