भ्रष्टाचारी शशिकलांसाठी तुरुंगात वेगळे स्वयंपाकघर 

दिल्ली : वृत्तसंस्था – भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगणाऱ्या अण्णाद्रमुकच्या काढून टाकण्यात आलेल्या नेत्या व्ही.के. शशिकला यांना येथील कारागृहात विशेष वागणूक देण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तक्रार केल्यावर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे.
बंगळूरु येथील परप्पाना अग्रहारा तुरुंगात शशिकला यांना प्राधान्याची वागणूक देण्यात आली आणि त्यांच्यासाठी एक वेगळे स्वयंपाकघर होते, असा दावा तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक (कारागृह) डी. रुपा यांनी जुलै २०१७ मध्ये केला होता. या आरोपांची चौकशी करणारे आयएएस अधिकारी विनय कुमार यांनी त्यांच्या अहवालात या आरोपाला होकार दिला असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते नरसिंह मूर्ती यांनी सांगितले. माहितीच्या अधिकाराखाली मी हा २९५ पानांचा अहवाल वाचला आहे. शशिकला यांना तुरुंगात खास वागणूक देण्यात आल्याची त्यात पुष्टी करण्यात आली आहे, असे मूर्ती यांनी पीटीआयला सांगितले.

प्रकाश आंबेडकर ‘या’ अटीवर काँग्रेसशी आघाडी करायला तयार 

शशिकला यांना 14 फेब्रुवारी 2017 रोजी या तुरुंगात आणल्यानंतर सर्व कैदी महिलांना बाहेरच्या खोल्यांमध्ये हलवण्यात आले आणि या खोल्या शशिकला यांच्यासाठी देण्यात आल्या. तुरुंगात कैद्यांसाठी स्वतंत्र आचारी किंवा स्वयंपाकगृहाची तरतूद नाही. पण शशिकला यांच्यासाठी हा नियमही डावलण्यात आला असल्याचा आरोप मूर्ती यांनी केला आहे.
शशिकला यांनी सुरुवातीला टिव्ही, मांसाहारी आणि घरी बनवलेल्या अन्नाचीही मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना लाचही दिली होती. पण या सुविधा नाकारण्यात आल्या होत्या, असेही मूर्ती यांनी सांगितले.

वरिष्ठ पोलिस अधिकारी डी. रुपा यांनीही शशिकला यांना झुकते माप मिळत असल्याचा आरोप केला होता. डी. रूपा यांचे तत्कालिन वरिष्ठ अधिकारी एच.एन.सत्यनारायण राव यांनाही लाच दिली गेली असल्याचा संशय रूपा यांनी केला होता. मात्र अल्पावधीतच रूपा यांची बदली वाहतुक विभागात केली गेली होती.