गतिरोधकावर दुचाकी आदळली, २ ठार २ जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिकमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन ठार झाले तर दोन जण जखमी झाले. दोन दुचाकीवरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारींची गाडी गतिरोधकवार आदळून तरुण खाली पडले. त्याचवेळी पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकच्या चाकाखाली आले. यामध्ये दोन जणांचा मृत्य झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. हा अपघात आज (शनिवार) नाशिक गंगापूर रोडवर सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.

गोटिराम शेवरे (वय-२४ रा. खरवळ, हरसुल), त्रंबक राऊत (वय-२५ रा. काकडदरी, हरसुल) असे मृत्यू झालेल्या तरुणाची नावे आहेत तर कैलास माळेकर (वय-२०) आणि पांडुरंग टोपले हे दोघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन भरधाव वेगात जात असताना गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी जोरात आदळून दोघेजण रस्त्यावर पडले. त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवरुन जाणारे तरुण देखील पडले. यावेळी पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकच्या चाकाखाली गोटिराम आणि त्रंबक आले. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कैलास आणि पांडुरंग हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ट्रकची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच नाशिक शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करत ट्रक घटनास्थळावरुन हलविला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मृत तरुणांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.