एका रात्रीत खाणीत बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

पोलिसनामा : कोल्हापूर

हातकणंगले तालुक्यातील टोप येथील क्रशर खाणीत गुरुवारी (दि.२४) अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविला आहे. एका रात्रीत हा पुतळा बसविण्यात आला असून, कोल्हापूर महापालिकेला खाणीत कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालायने महापालिकेला टोप (ता. हातकणंगले) येथील खाणीची जागा वापरण्यास अनुमती दिली आहे. मात्र, टोप परिसरातील गावांचा याला विरोध आहे. गेल्या काही दिवसांत हा विरोध मावळला असे, वाटत असतानाच पंचक्रोशीतील अज्ञात गावकऱ्यांनी खाणीत शिवरायांच्या पुतळा उभारून कचरा टाकण्यास विरोध ठाम असल्याचे दाखवून दिले.

चौथऱ्यावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याची उंची सुमारे सहा फूट आहे. पोलिसांना सकाळी ही माहिती कळाल्यानंतर त्यांची तारांबळ उडाली. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणाऱ्या या पुतळ्यामुळे एखादी अप्रीय घटना घडून नये, या भितीने पोलिसांनी तेथे तातडीने बंदोबस्त लावला. पण, टोप परिसरच नव्हे, तर गावांतूनही नागरिकांनी पुतळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

एका रात्रीत चौथरा उभा करून त्यावर पुतळा उभारल्याबद्दल संबंधित तरुणांचे दबक्या आवाजात कौतुक होत होते. तर ग्रामस्थांच्या कचरा टाकण्याला विरोध करण्याच्या अनोख्या मार्गालाही दाद दिली जात होती.