नव्या अभ्यासात खुलासा ! पाण्याजवळील ठिकाणांवर फेरफटका मारल्यानं मिळते सकारात्मकता

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एका नवीन अभ्यासात असे आढळले आहे की, समुद्र किनारी, तलाव, नद्या आणि अगदी कारंजे यासारख्या पाण्याच्या ठिकाणी चालल्याने लोकांच्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ (ISGlobal) च्या अभ्यासानुसार, लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी निळे किंवा नैसर्गिक ठिकाणे अतिशय अनुकूल असतात.

५९ वयस्क लोकांवर केला गेला अभ्यास
यासाठी ५९ वयस्क लोकांचा डेटा वापरला गेला, जे आठवड्यातून दररोज २० मिनिटे बार्सिलोनाच्या समुद्र किनारी चालले. त्यानंतर एका वेगळ्या आठवड्यात त्यांनी शहरी वातावरणात दररोज २० मिनिटे घालवली. मग तिसऱ्या आठवड्यात त्यांनी तितकाच वेळ घरात घालवला. प्रत्येक क्रिया करण्यापूर्वी आणि नंतर त्या सर्व सहभागींचे रक्तदाब आणि हृदय गती मोजली गेली. तसेच त्या लोकांनी तिन्ही वातावरणात घालवलेले त्यांचे अनुभव देखील सांगितले.

सगळ्यांच्या मूडमध्ये दिसली सुधारणा
शहरी नियोजन वातावरणाचे संचालक मार्क निवेनहुइजेन म्हणाले, “शहरी वातावरणात चालणे किंवा विश्रांती घेण्याच्या तुलनेत निळ्या आकाशाखालील पाण्याजवळ चालणाऱ्या लोकांच्या मूडमध्ये आम्ही लक्षणीय सुधारणा पाहिली.” त्याचबरोबर बार्सिलोनाच्या समुद्रकिनार्‍याजवळ चालत असलेल्या सहभागींनीही त्यांचा मूड चांगला असल्याचे सांगितले. ISGlobal चे संशोधक क्रिस्तोफर वर्ट म्हणाले, “जेव्हा मुक्त आकाशाखाली चालणाऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचे आकलन केले तेव्हा आम्हाला असे आढळले की, शहरी ठिकाणांच्या तुलनेत अशा ठिकाणी दीर्घकाळ चालल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.”

निळ्या ठिकाणांवर चालल्याने मिळतात हे फायदे
सध्या जगातील जवळजवळ ५५ टक्के लोक शहरामध्ये राहतात. अधिक काळ निरोगी राहण्यासाठी लोकांनी निळ्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. ISGlobal च्या अभ्यासात म्हटले गेले आहे की, हिरव्या नैसर्गिक ठिकाणी जास्त काळ राहिल्यास लठ्ठपणा कमी होणे, मुलांची एकाग्रता वाढणे आणि प्रौढ लोक अधिक काळ निरोगी राहणे यासह विविध प्रकारचे आरोग्य फायदे मिळतात.