ब्राझीलमधील कार कंपनीचा कर्मचारी आहे ‘हे’ खास श्वान, सोशल मिडीयावर व्हायरल होतेय त्याची ‘स्टोरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्राझीलमध्ये एक असा कुत्रा आहे, जो एका कार कंपनीचा कर्मचारी आहे. हे वाचायला आणि ऐकायला आश्चर्यकारक वाटेल कारण तो कुत्रा सुरक्षा कंपनीच्या सुरक्षा पथकाचा भाग नाही किंवा कोणत्याही मोहिमे अंतर्गत नाही, परंतु हा कुत्रा या कंपनीत ‘सेल्समन’ म्हणून तैनात आहे. ब्राझीलमधील हुंडई या कार कंपनीच्या शोरूमची ही कहाणी आहे, जिथे कंपनीने एका स्ट्रीट डॉगला दत्तक घेऊन त्याला कंपनीच्या कर्मचाऱ्याचा दर्जा दिला आहे. हा कुत्रा आणि त्याची कहाणी आजकाल सोशल मीडियावर खूप वाचली जात आहे आणि ती लोकांना आवडत देखील आहे.

रिपोर्ट्सनुसार, ब्राझीलच्या एस्प्रिटो सॅंटो राज्यात हुंडईचे एक शोरूम आहे. जेव्हा कोणताही ग्राहक या शोरूममध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची भेट टुशों प्राइम (Tucson Prime) नावाचा कुत्र्याशी होते. हा कुत्रा या शोरूमचा कर्मचारी आहे आणि तो येथे सेल्समन म्हणून तैनात आहे. त्याचे स्वतःचे खास ओळखपत्र देखील आहे.

शोरूमच्या कर्मचार्‍यांशी झाली मैत्री
खरं तर, हा कुत्रा बर्‍याचदा या शोरूमच्या बाहेर फिरायचा आणि हळूहळू शोरूमच्या कर्मचाऱ्यांशी त्याची मैत्री झाली. लवकरच शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला आपल्यात सामील करून घेतले आणि त्याला कंपनीत मानद कर्मचारी म्हणून पोस्ट केले. कंपनीने या वर्षाच्या मे मध्ये त्याला आपल्या सोबत सामील केले होते.

नुकतीच त्याची कहाणी कंपनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली असून शोरूमच्या आतील वाहनांबरोबर त्याचा फोटो देखील पोस्ट केला गेला आहे. या पोस्टमध्ये कंपनीने लिहिले आहे की, ‘हुंडई प्राइम डीलरशिपमध्ये एक सेल्स डॉग आहे. हा नवीन सदस्य जवळपास एक वर्षाचा असून तो हुंडई कुटुंबात सामील झाला होता आणि त्याने आपल्या सहकाऱ्यांची आणि ग्राहकांची मने जिंकली आहेत.’

इतकेच नाही तर आता या कुत्र्याच्या नावाने एक स्वतंत्र इन्स्टाग्राम अकाउंटही तयार केले गेले आहे, ज्याचे 28 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि यात दररोज त्याचे फोटो पोस्ट केले जात आहेत, जे लोकांना खूप आवडत आहेत.