महिलेचा गळा चिरणाऱ्या चोरट्याला ग्रामस्थांनी पकडले

डहाणू : पोलीसनामा ऑनलाईन – शेतातून घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न फसल्यावर तिच्या गळ्यावर चाकूने वार करुन पळून गेलेल्या चोरट्याला सोमवारी पहाटे स्थानिकांनी पकडले. पोलिसांना आरोपी पकडल्याचा निरोप दिला पण, पोलिसांनी उलट त्यांनाच कळविले की वाहन नसल्याने येता येणार नाही. तुम्हीच त्याला घेऊन पोलीस ठाण्यात आणा. त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अखेर बऱ्याच उशिराने पोलीस आले व त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

याबाबतची माहिती अशी, धाकटी डहाणू येथील बेचाळीस वर्षाच्या सारिका बारी या रविवारी शेतात काम करीत होत्या. हल्लेखोर हा चोरीच्या उद्देशाने तिच्या शेतावर गेला होता. तिने हटकल्याने तो तेव्हा तेथून निघून गेला. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्या घराकडे निघाल्या असताना त्यांचा पाठलाग केला. मागून येऊन त्याने गळ्यातील सोनसाखळी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. सावध असलेल्या सारिका यांनी त्याला प्रतिकार केला. त्यांच्या झटापट होऊन तिने त्याचा हा डाव हाणून पाडला. तेव्हा त्याने आपल्याकडील चाकू काढून सारिका यांच्या गळ्यावर वार केला व तो पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सारिका यांना पाहून ग्रामस्थांनी त्यांना तातडीने आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्या गळ्यावर टाके घालण्यात आले. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.

वाणगाव पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तिची फिर्याद घेतली. तिने सांगितलेल्या वर्णनानुसार तो हल्लेखोर गावाशेजारी राहणारा अशोक वाघेला असल्याची ओळख पटली. ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा परिसरात शोध घेतला. पण तो मिळून आला नाही. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याचा फोटो व घटनेची माहिती परिसरात सर्वत्र पाठविण्यात आली.

सोमवारी पहाटे बॅग घेऊन पळताना अशोक वाघेला याला काही स्थानिकांनी सेंट मेरीज हायस्कुलजवळ पाहिले. तो डहाणु रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळत होता. लोकांनी या महिलेच्या नातेवाईकांना कळवले. त्यांनी तातडीने तेथे जाऊन त्याला पकडले व वाणगाव पोलिसांशी संपर्क साधला. परंतु, पोलिसांनी वाहन नसल्याचे सांगत त्यालाच पोलीस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा ग्रामस्थांनी संताप व्यक्त केल्याने बऱ्याच उशिरा पोलीस तेथे आले व त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.