जळगाव, सांगली आणि पुण्यातील अपघातात एकूण 16 ठार, एकाच कुटूंबातील 10 जणांचा समावेश (व्हिडीओ)

जळगाव / सांगली / पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नागरिकांची सोमवारची सकाळ ही अपघात वार ठरली आहे. राज्यात वेगवेगळ्या तीन अपघातात १६ जण ठार झाले आहेत. बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर क्रुझर – डंपर हे समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात १० जण ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे -पारेकरवाडी रोडवर स्टेरिंग लॉक झाल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडल्याने ५ जणांचा गाडीत अडकून मृत्यु झाला.

यावल -फैजपूर रोडवरील हिंगोणा गावाजवळ रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा समावेश आहे. रावेर तालुक्यातील चिंचोल गावातील हे कुटुंबीय असून त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. चोपडा येथील स्वागत समारंभ संपल्यानंतर चिंचोल येथील बाळु नारायण चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी, दोन बहिणी यांच्यासह कुटुंबातील १० जण क्रुझरने घरी परत येत होते. यावल -फैजपूर रोडवर हिंगोणा गावाजवळ डंपर आणि क्रुझर यांच्यात समोरासमोर धडक दिली. दोन्ही वाहने वेगात होती.

प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय ४५), सोनाली जितेंद्र चौधरी (वय ३५), सोनल सचिन महाजन (वय ३७),गलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय ३५), उमेश चौधरी (वय २८), प्रभाकर नारायण चौधरी(वय ६३), प्रिया जितेंद्र चौधरी (वय १०), प्रियंका नितीन चौधरी (वय २५, सर्व रा. चिंचोली, ता. मुक्ताईनगर), सुमनबाई श्रीराम पाटील (वय ६०, रा. निंबोल, ता. रावेर), संगीता मुकेश पाटील (वय ३३, रा. मुक्ताईनगर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. सर्वेश नितीन चौधरी, शंतनु मुकेश पाटील, अंवी नितीन चौधरी, मीना प्रफुल्ल चौधरी, सुनिता राजाराम चौधरी, आदिती मुकेश पाटील, शिवम प्रभाकर चौधरी हे जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

स्टेरिंग लॉक झाल्याने कार विहिरीत पडून ५ जणांचा मृत्यु
नातेवाईकांच्या अत्यंविधी कार्यक्रमाला जाताना वॅगनार कारचे स्टेरिंग अचानक लॉक झाल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळून त्यात ५ जणांचा बुडुन मृत्यु झाला. आटपाडी तालुक्यातील झरे पारेकरवाडी रोडवर रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मच्छिंद्र पाटील (वय ६०), कुंडलीक बरकडे (वय ६०), गुंडा डोंबाळे (वय ३५), संगीता पाटील (वय ४०), शोभा पाटील (वय ३८) अशी मृत्यु झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील पारेकरवाडी येथून सातारा जिल्ह्यातील चितळी येथील नातेवाईकांच्या अंत्यविधी कार्यक्रमाला ६ जण निघाले होते. वाटेत गाडीचे स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये जाऊन पडली. विहीर पाण्याने भरलेली असल्याने गाडीत असलेल्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. गाडीतच पाच जणांचा मृत्यु झाला. हरिबा वाघमोरे हे गाडीची काच फोडून बाहेर आल्याने बचावले.

पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पारेकरवाडी व झरे परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. त्यात पाच जणांचे आत मृतदेह होते.
पुण्यातील टिळक रोडवर भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा अचानक समोर असलेल्या रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी थेट पीएमसी बसखाली गेल्याने एक तरुणाचा मृत्यु झाला. आकाश तुकाराम विधाते (वय २४, रा. बाणेर) असे या तरुणाचे नाव आहे. आकाश विधाते यांच्या कुटुंबियांचा दुधाचा व्यवसाय आहे. आकाश रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टिळक रोडने अलका टॉकिजकडून स्वारगेटच्या दिशेने जात होता. यावेळी रस्त्यावर अगदी तुरळक वाहने जात होती. साहित्य परिषद चौक ओलांडल्यानंतर लिमयेवाडी येथील बोळातून अचानक एक रिक्षा आली. रिक्षाला धडक होऊ नये, म्हणून आकाशने प्रयत्न केला. परतु, त्याची दुचाकी रिक्षाला घासल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी वेगाने घसरत गेली. त्याचवेळी समोरुन पीएमपी बस येत होती. ही दुचाकी घसरत थेट पीएमपीच्या पुढून खाली घुसली. त्यात बसचे चाक आकाशच्या डोक्यावरुन गेले. त्याची दुचाकी बसखाली अडकली. तेव्हा बस मागे घेऊन त्याला बाहेर काढण्यात आले. नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.