‘सोमेश्वर’च्या 21 संचालकपदासाठी एकूण 638 अर्ज दाखल; शेवटच्या दिवशी 387 इच्छुकांनी केले अर्ज दाखल

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या बारामती तालुक्यातील श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी (दि.२२) अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी तब्बल ३८७ एवढ्या इच्छुकंनी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे २१ जागांसाठी तब्बल ६३८ एवढ्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने आता अर्ज माघारी कोण घेणार हा प्रश्न औचुक्याचा ठरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कृती समिती व भाजपचे पँनेल रिंगणात उतरले आहे.

श्री. सोमेश्वर सह. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीकडून सोमेश्वरचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप, पुणे जि. प. चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, माजी चेअरमन शहाजीराव काकडे, राजवर्धन शिंदे, दत्ताजीराव चव्हाण, लक्ष्मण गोफणे, राजेश चव्हाण, दिग्विजय जगताप, शैलेश रासकर, महेश जगताप, अजिंक्य सावंत, राजेश काकडे आनंदकुमार होळकर, सिध्दार्थ गीते, विक्रम भोसले, सतीश सकुंडे, ऋषी गायकवाड, तर शेतकरी कृती समितीच्या वतीने शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, राहुल काकडे, अभिजीत काकडे, आप्पासो गायकवाड, शहाजी जगताप, प्रा. बाळासाहेब जगताप, जालिंदर जगताप, कल्याण भगत या दिग्गजांसह ५५ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कारखान्याच्या इतिहासात प्रथमच भाजप सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरत असून भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून ३५ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, सोमेश्वरचे माजी संचालक पी. के. जगताप, बाळासो भोसले, हनुमंत शेंडकर, खलील काझी, आदिनाथ सोरटे, , सोमनाथ राणे आदींचा समावेश आहे.

यावेळी सोमेश्वर च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी सर्वात जास्त अर्ज भरले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वांना सामावून घेत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या इच्छुकांची नाराजी दूर करावी लागणार आहे. उमेदवारी माघारी घेण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व इच्छुक उमेदवारांशी अजित पवार संपर्क साधणार असल्याचे समजते.

उमेदवारी अर्ज दाखल करणा-यांच्या रांगा
आता राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना सोमवारी सोमेश्वर कारखान्याचा निवडणुकीत आज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तोबा गर्दी केली होती. सकाळी १० वाजल्या पासूनच अर्ज भरण्यासाठी गर्दी करत रांगा लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याची चर्चा होती.