गँगमनच्या सतर्कतेने रेल्वे अपघात टळला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – परभणी ते पंढरपूर ही एक्सप्रेस रात्री वेगाने आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत होती. त्याचवेळी एका गँगमनला रुळ तुटल्याचे लक्षात आले. त्याने ही माहिती तातडीने स्टेशनमास्तरांना दिली. त्यानंतर त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबविली गेल्याने परभणी ते पंढरपूर एक्सप्रेसचा संभाव्य अपघात टळला आहे.

ही घटना मध्यरात्री गंगाखेड ते धोंडी दरम्यान मुळी गावाजवळ घडली. हिवाळ्यात तापमान खाली गेल्याने रुळ अकुंचन पावतात. त्यामुळे जेथे रुळाला जोड दिलेले असतात. तेथे गॅप पडण्याची शक्यता आहे. हे अंतर मोठे असेल तर वेगाने जाणाऱ्या रेल्वेमुळे सुटा झालेला रुळ बाजूला जाण्याची व मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही रेल्वे गाडी गेल्यानंतर गँगमन संपूर्ण मार्गाची पाहणी करुन रेल्वेमार्ग व्यवस्थित आहे ना याची तपासणी करीत असतात. त्याप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास भर थंडीत एक गँगमन गंगाखेड ते धोंडी या रेल्वे मार्गाची तपासणी करीत होते. त्यावेळी त्यांना मुळी गावाजवळ रुळ तुटल्याचे लक्षात आले. त्याचवेळी या मार्गावरुन परभणी ते पंढरपूर ही गाडी जाणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने स्टेशनमास्तरला फोन करुन याची माहिती दिली. त्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने ही गाडी वाटेत थांबविली. त्यानंतर २ तासात रुळ दुरुस्त करण्यात आला.

या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पण गँगमनच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला.