UP चा गँगस्टर मुंबईत विकत होता भाज्या, पोलिसांनी BMC अधिकारी बनून केली अटक

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशमधील फरार गुन्हेगार आणि मिर्ची गँगचा प्रमुख असणार्‍या आशू जाट याला हापूड पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने विलेपार्ले येथून अटक केली आहे. भाजप नेता राकेश शर्मा आणि नोएडामधील एक्झीक्युटीव्ह गौरव चंदेल यांच्या हत्या प्रकरणात पोलीस आशूच्या मागावर होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशू वेशांतर करुन मुंबईमध्ये राहत होता. त्याने दाढी वाढवून जोगेश्वरीमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. हत्या, चोरी आणि अपहरणासारखे 51 गुन्हे आशूवर दाखल आहेत. त्याच्या पत्नीला आणि टोळीत अन्य सदस्यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेतले होते. आशूने उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष दलाकडून एन्काऊंटर होईल अशी भीती व्यक्त केली आहे. आशू विलेपार्ले येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये एकटाच राहत होता. त्याने उत्तर प्रदेशमधील गँगमधील एका व्यक्तीला फोन केला होता. त्याने केलेल्या याच एका फोन कॉलमुळे आम्ही त्याच्यापर्यंत पोहचू शकलो असे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने आणि उप निरीक्षक शरद जीने हे तीन दिवस भाजी विक्रेता म्हणून विलेपार्ले परिसरामध्ये गस्त घालत होते. आशूने स्वत:चा फोन स्वीच ऑफ ठेवला होता. तो बाजारामध्ये भाजीचे एक छोटे दुकान चालवित होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.