ऑस्ट्रेलियाच्या संसदेच्या परिसरात महिलेवर बलात्कार, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मागितली माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एका महिलेसोबत दुष्कर्म केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्या महिलेची माफी मागितली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संसद संकुलामध्येच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणानंतर देशातील वर्क कल्चरवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून त्याची चौकशी केली जाईल.

या महिलेचे म्हणणे आहे की, मार्च 2019 मध्ये संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्ड्सच्या कार्यालयात तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. याशिवाय आरोपी हा मॉरिसनच्या सत्ताधारी लिबरल पार्टीशीही संबंधित असल्याचेही या महिलेचे म्हणणे आहे. या महिलेने सांगितले की तिने एप्रिल 2019 मध्ये पोलिसांना याबाबत कळवले होते, पण आता तिने आपल्या करिअरचा धोका पत्करल्यानंतर औपचारिक तक्रार करण्याचे ठरविले आहे. या महिलेचे म्हणणे असे आहे की, तिने याबद्दल रेनॉल्ड्स कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितले होते, परंतु त्यानंतरही तिला त्याच कार्यालयातील बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले गेले. सोमवारी संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्ड्स म्हणाले की, महिलेने तिच्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली होती.

दरम्यान, महिलेवर औपचारिक तक्रार न करण्यासाठी दबाव आणल्याचे त्यांनी नाकारले. आता मंगळवारी स्कॉट मॉरिसनने त्या महिलेची माफी मागितली असून या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की असे होऊ नये, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. यासह ते असेही म्हणाले की मी वचन देतो की महिलांना कामाच्या ठिकाणी पूर्ण सुरक्षा दिली जाईल.