Lonavla News : गिर्यारोहण शिबिरासाठी आलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन –   गिर्यारोहण शिबिरासाठी राजमाची येथे आलेल्या एका तरुणाचा किल्ला परिसरात असलेल्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा तरुण डोंबिवली येथील रहिवासी आहे. ही घटना शनिवारी (दि.13) सायंकाळी घडली. कौशिक अय्यर (वय-21 रा. ठाकुर्ली, डोंबिवली, ठाणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील शिवसह्याद्री ट्रेकर्स संस्थेकडून राजमाची येथे गिर्यारोहण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 100-150 जणांनी भाग घेतला होता. शनिवारी सायंकाळी शिबिरात सहभागी झालेल्या तरुणांचा एक ग्रुप आला. यामध्ये मृत कौशिक हा देखील होता. या ग्रुपमधील काही तरुण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले.

कौशिक याने पोहण्यासाठी पाण्यात सूर मारला. मात्र बराच वेळ झाला तरी तो वर न आल्याने त्याच्यासोबत आलेल्या मित्रांना संशय आला. त्यांनी पाण्यात उतरुन कौशिकचा शोध घेतला. मात्र, कौशिकचा शोध लागला नाही. तसेच अंधार पडल्याने त्याचा शोध थांबवण्यात आला. दरम्यान, या घटनेची माहिती कामशेत पोलिसांना देण्यात आली. कामशेत पोलिस ठाण्यचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलिस कर्मचारी महेश दौंडकर, महेंद्र वाळुंजकर, मिथून झेंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने कौशिकचा शोध सुरु केले. ग्रामस्थ कौशिकचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह आढळला.