चांबळीत गावठी पिस्तूलासह एका युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील चांबळी येथील युवकास गावठी पिस्तुलासह काडतुस बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीनाथ अशोक बडदे असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नांव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहा.पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी सासवड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड येथील ३०७ च्या गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी श्रीनाथ अशोक बडदे ( रा. कोंडीत ) हा चांबळी येथे बेकायदेशीर गावठी पिस्तुलासह येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली.  त्यानुसार पथक चांबळी गावात गेले असता त्यांना एका पिठाच्या गिरणी समोर एक इसम बसलेला दिसला. मात्र त्या इसमाने पोलिसांना पाहून तेथून पळ काढल्यामुळे. पोलिसांना त्या इसमाचा संशय आला. पोलिसांनी त्या इसमास पाठलाग करून ताब्यात घेतले व त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने श्रीनाथ अशोक बडदे (वय-२० ) रा.कोंडीत असे सांगितले. त्यावेळी बडदे याची पोलिस पथकांने झडती घेतली असता त्याच्या कमरेस पॅंटमध्ये खोचलेले बेकायदा गावठी पिस्तूल व एक काडतूस मिळाले. या कारवाईत पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार दयानंद लेमन, डी . जी. जगताप, पोलिस नाईक विजय कांचन, पोलीस हवालदार, धिरज जाधव , मंगेश भगत, प्रतीक जगताप यांनी सहभाग घेतला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहा.पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी बेकायदा गावठी पिस्तूल व एक काडतूस बाळगल्याप्रकरणी श्रीनाथ अशोक बडदे याच्या विरोधात सासवड पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्ह दाखल केला आहे. पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक निरंजन चौखंडे करीत आहे.