इचलकरंजी : युवकाचा सिमेंटच्या खांबाने ठेचून खून

हातकणंगले  पोलीसनामा ऑनलाइन – इचलकरंजी- हातकणंगले मार्गावरील कोरोची माळावर अज्ञात मारेकरयांनी एका युवकाचा सिमेंटच्या खांबाने, दगडाने चेहरा ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. शुभम उमेश कमलाकर वय (२१, रा. हातकणंगले) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेची माहिती घेतली. घटनास्थळी सिमेंटचा पोल, दोरी व नशा करण्याचा बँड मिळून आला आहे. खूनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी बध्यांची प्रचंड गर्दी झाली होती.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील मयत शुभम हा अविवाहीत आहे. तो रिक्षा चालवायचा तसेच तो वेल्डींगच्या दुकानात कामालाही होता. काम संपल्यानंतर तो मित्रासोबत कोरोची येथील माळावरती आला होता. यावेळी त्याने मित्रासोबत नशा केली. यामध्ये त्यांच्यात वाद निर्माण होऊन शुभमला दगडाने, सिमेंटच्या खांबाने तोडावर मारहाण करून जखमी केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी महिला पोलीस उपाधिक्षक जयश्री गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक भवड यांनी घटनास्थळ भेट दिली.

या माळावर व्यायाम करण्यासाठी लोकाची वर्दळ असते. परंतु, अंधार पडल्यानंतर शुभचा प्रथम गळा आवळून व नंतर चेहरा ओळखू नये म्हणून त्याच्या चेह-याचा चेंदामेंदा केल्याचा संशय घटनास्थळी व्यक्त केला जात होता. अद्याप खुनी सापडले नसून हातकणंगले पोलीस तपास करीत आहे. शुभमचा खून हातकणंगले इचलकरंजी मार्गानजीक असलेल्या कोरोची माळावर हातकणंगले हद्दीत झाला. त्यामुळे नेमकी हद्द शहापूरची का हातकणंगलेची यावरून वाद सुरू झाला. परंतु, हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हदीत असल्याची खात्री झाल्याने हातकणंगले पोलिसांनी पंचनामा केला.