CM योगी अदित्यनाथ यांना ‘बॉम्ब’नं उडवून देण्याची धमकी देणार्‍यास मुंबईतून अटक

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्ब ने उडवून देणार असल्याची धमकी देणारा संदेश पाठविणार्‍यास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  करमान अमीन खान (वय २५, रा म्हाडा कॉलनी, चुनाभट्टी, मुंबई) असे त्याचे नाव आहे. मुंबई पोलीस दलातील काळा चौकी युनिटने शनिवारी रात्री त्याला ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौ पोलीस मुख्यालयाच्या सोशल मिडिया हेल्प डेस्कवरील क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचा धमकीचा मेसेज २२ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता पाठविण्यात आला होता. याबाबत लखनौमधील गोमतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा मोबाईल मुंबईतील असल्याने लखनौ पोलिसांनी त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती.

काळा चौकी युनिटचे सहायक पोलीस आयुक्त रासम, काळा चौकी पोलीस निरीक्षक भास्कर कदम, धामणकर, उपनिरीक्षक राहुल प्रभू, सहायक फौजदार दत्ता कुढले, हवालदार भोसले, सोलाट, सपकाळ, पाटील व त्यांच्या पथकाने या मोबाईलचा तांत्रिक अभ्यास करुन त्याचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर शनिवारी रात्री खान याला ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून उत्तर प्रदेश पोलिसांचे एस टी एफ पथक मुंबईला येत आहे. रविवारी करमान खान याला न्यायालयात हजर करुन न्यायालयाकडून ट्रान्जीट रिमांड मिळाल्यानंतर त्याला लखनौला पाठविण्यात येणार आहे.