बागूल यांच्याकडून मदतनिधीचे वाटप

पुणे – गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात कात्रज, शिवदर्शन, पद्मावती परिसराला आंबील ओढ्यातील पुराचा फटका बसला होता. शिवाय अतिवृष्टीमुळे परिसराची अतोनात हानी झाली होती. पुरामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्तासाठी १५ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यातील पाच हजारांचा निधी तातडीचा निधी म्हणून चेकद्वारे शासनाने दिला होता. उर्वरीत दहा हजारांच्या निधीच्या चेकचे वाटप १४२ पूरग्रस्तांना नगरसेवक आबा बागुल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार तृप्ती कोलते पाटील आणि दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक घेवारे, सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल आदी उपस्थित होते.

सध्या १४२ पूरग्रस्तांना मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे. शिवदर्शन आणि तावरे कॉलनीतील पूरग्रस्तांना लवकरच निधीचे वाटप केले जाईल असे अमित बागुल यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या सहकार्यामुळे मदतनिधीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी निधीसाठी आवश्यक त्या सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या याबद्दल आबा बागुल यांनी प्रशंसा केली. एक वर्षाच्या आत आणि पावसाळ्यापूर्वी मदतनिधी मिळिल्याबद्दल पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.

अतिवृष्टीमुळे आंबील ओढ्यालगतच्या या परिसरात पूर आला. येथे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. अचानक आलेल्या पाण्याला वेग खूप होता. पाण्याचा लोंढा परिसरातील संपूर्ण भागात वेगाने शिरला. परिणामी परिसरातील लोकांच्या डोळ्यांदेखत घरातले अन्नधान्य, सामान, वाहने वाहून गेले.