हे काय नवीनच ! आता 10 रूपयाच्या ‘शिवभोजना’साठी द्यावं लागणार ‘आधार’कार्ड, ठाकरे सरकारची आणखी एक अट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीआधी १० रुपयांत शिवभोजन थाळी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सत्तेत आल्यावर याबाबतीत अंमलबाजावणी देखील झाली परंतु ही बहुचर्चित १० रुपयांत जेवण देण्याची योजना सध्या टीकेचं लक्ष्य ठरत आहे. यामागील कारण म्हणजे जर या योजनेला लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड आणि एक फोटो बंधनकारक असणार आहे. मुंबईत जवळपास १५ ठिकाणी अशाप्रकारची योजना सुरु करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी एक सॉफ्टवेअर देखील बनविण्यात आलं आहे. त्यात आयडेंटीसाठी १० रुपयांत जेवणाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश गोरगरिबांना कमी पैशात जेवण मिळावे हा आहे. त्यामुळेच अशाप्रकारे नियमअटी लावण्यात आल्या असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. तर भाजपाने या योजनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. कारण १० रुपयात जेवणाची थाळी देताना खूप अटी व शर्थी घालण्यात आल्या आहेत. गोर गरीबाला जेवू घालताय की त्याच्या गरिबीची थट्टा करताय, असा प्रश्न उपस्थित करून सर्वांना कुठल्याही अटी व शर्तींशिवाय जेवण मिळावे अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे. बिनशर्त आणि सरसकट अशा शब्दांचे आश्वासन द्यायचे आणि प्रत्यक्षात मात्र वेगळंच काही करायचं, हाच सरकारचा खरा चेहरा आहे. ठाकरे सरकारची कर्जमाफी जितकी फसवी आहे तशीच शिवभोजन योजना देखील फसवी आहे असा टोला देखील राम कदम यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

येत्या २६ जानेवारीला राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी दिली होती. शिवभोजन योजनेत २ चपाती, १ वाटी भाजी, १ वाटी डाळ आणि भात अशा प्रमाणात खाद्यपदार्थ मिळणार आहेत आणि ते देखील फक्त दुपारी १२ ते २ या दोन तासांच्या कालावधीतच मिळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यासाठी तीन महिन्यांसाठी सुमारे ६ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या शिवभोजन थाळी योजनेची सुरुवात २६ जानेवारी पासून सुरु होणार असून त्याआधीच ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –