‘नाइट लाइफ’ वर टीका करणारे ‘प्रदूषित’ मनाचे !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्या विरोधी पक्ष भाजप नेत्यांवर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. नाइट लाइफचा प्रयोग हा चांगल्या हेतूनं होत असून त्यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे. शुद्ध हेतूने हा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. या प्रयोगावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत, असा घणाघाती आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईमध्ये नाइट लाइफ सुरु करण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच मांडली होती. मात्र, त्याला मूर्तरूप आले नव्हते. आता राज्यामध्ये त्यांचे सरकार आल्याने त्यांनी हा प्रयोग प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. येत्या 26 जानेवारीपासून रात्री नाइट लाइफ हा प्रयोग सुरु होणार असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला काही भागांमध्ये हा प्रयोग केला जाणार असून त्यानंतर हा प्रयोग संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे. मात्र, या प्रयोगावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. विरोधी पक्षाने हा प्रयोग झाल्यास मुंबईत निर्भया बलात्कारासारख्या हजारो घटना घडतील. ही आपली संस्कृती नाही अशी टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली आहे. तसेच या योजनेमुळे मुंबईकरांना त्रास झाल्यास कडाडून विरोध करण्याचा इशारा देखील भाजपने दिला आहे.

भाजपच्या या टीकेचा आदित्य ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठी काम करतेय. लोकांच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. नाइट लाइफ हा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी करत असल्याचे सांगून आमचे मन स्वच्छ असल्याचे त्यांनी सांगितले. शुद्ध हेतूनेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित असल्याचा टोला त्यांनी विरोध करणाऱ्या भाजप आणि भाजपनेत्यांना लगावला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –