रणवीर अन् रणबीरच का ? मंत्री आदित्य ठाकरेंची देखील ड्रग टेस्ट करा, भाजपाच्या ‘या’ नेत्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळे ड्रग रॅकेटचीही चर्चा जोरात सुरू आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील काही व्यक्तींना आणि मुंबई पोलिसांना टार्गेट करणाऱ्या अभिनेत्री कंगनाने अभिनेत्यांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्याचीच री ओढत माजी खासदार नीलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधत ‘आदित्य ठाकरे यांनी ड्रज टेस्ट करावी’, अशी मागणी केली आहे.

कंगनाने या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी ड्रग टेस्ट करून घ्यावी, अशी मागणी केली होती. हे चौघे कोकेनच्या आहारी गेल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि पसरणाऱ्या अफवांना उत्तर द्यावे. असे करून ते लाखो तरुणांसमोर एक उदाहरण ठेवू शकतात, अशा आशयाचं ट्वीट तिने केले होते. एखाद्या कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याच्या रक्ताची चाचणी करून घ्यायला हवी, असेही मत तिने मांडले होते.

कंगनाच्या ह्याच मागणीला दुजोरा देत नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘फक्त रणवीर आणि रणबीरच कशाला? आदित्य ठाकरे यांनीही ड्रग टेस्ट करावी. शेवटी बॉलिवूडमधील अंतर्गत वर्तुळात त्यांचाही वावर असतो,’ असेही नीलेश राणे यांनी म्हटले आहे.

नीलेश राणे हे सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यांच्यावर संशय व्यक्त करत आहेत. भाजपचा कुठलाही मोठा नेता आदित्य यांचं थेट नाव घेत नसला तरी नीलेश राणेंनी मात्र थेट नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे.