‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची भाजपची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या जयकुमार गोयल यांच्या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करण्यात आली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशभरातून आणि महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पुस्तकावरून वाद चघळला असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यावरून भाजपला फैलावर घेतले आहे. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलने सुरु झाली आहेत.

संभाजी ब्रिगेडने भाजपला धमकी दिली आहे. तर मनसेने पुस्तकाचे लेखक सध्या दिल्लीत आहेत, कधीतरी मुंबईत येतीलच अशी धमकी दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते श्याम जाजू यांनी सांगितलंय. प्रकाशकांना हे पुस्तक मागे घेण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात पुस्तकावरून सुरू असलेला वाद शांत करण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.

विरोधकांकडून पुस्तकावरून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जो पर्य़ंत ब्रह्मांड आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊच शकत नाही. नरेंद्र मोदी सुद्धा अशी तुलना करणार नाही. मात्र विरोधकच राईचा पर्वत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/