‘आम्ही राजघराण्यात जन्मलो हे पूर्ण महाराष्ट्राला माहितीये, राऊतांना नेमके काय पुरावे हवेत ?’ : शिवेंद्रराजे भोसले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून अनेक वादंग झाले. यानंतर संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाजावर टीका केल्याने संजय राऊत वादात सापडले आहेत. पुस्तक समोर आल्यानंतर संजय राऊतांनी म्हटलं होतं की, भाजपमध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावाही मागितला. त्यांच्या या वक्तव्याला आता शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “आम्ही राजघराण्यात जन्माला आलो याचे नेमके काय पुरावे द्यायचे ? आम्ही राजघराण्यात जन्माला आलो आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. हा वाद त्यांनी सुरू केला आहे आता तो कसा संपवायचा हे त्यांनीच बघावं.”

याशिवाय भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद आहे असा सवालही त्यांनी केला आहे.

राऊतांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितल्याने आता या मुद्द्यावरून वातावरण तापताना दिसत आहे. आज के शिवाज नरेंद्र मोदी या पुस्तकावरून वाद सुरु असताना महाराष्ट्रातील जनता यावर बोलत आहे. तर छत्रपतींच्या वंशजांनीही यावर बोललं पाहिजे असंही राऊत म्हणाले होते.

शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का ? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान त्यांनी उदयनराजेंना दिले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/