‘गोव्यासाठी ‘आम आदमी’ एकमेव पर्याय’

मडगाव (गोवा): वृत्तसंस्था – गोव्याला योग्य दिशा देण्यासाठी आम आदमी पक्षच एकमेव पर्याय आहे. भ्रष्टाचारमुक्त वातावरण पाहिजे असल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी योग्य विचार करून आपचे लोकसभा उमेदवार एल्विस गोम्स यांना निवडून आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केले आहे. गोमंतकीय जनता गोव्यातील भ्रष्टाचारमय वातावरण, लाचखोरी प्रकरणामुळे त्रस्त झाली आहे असेही संजय सिंह म्हणाले.

मडगाव येथील आपच्या कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना संजय सिंह म्हणाले की, “आपच्या दिल्ली सरकारने आपल्या राजवटीत जनतेला आरोग्य, शिक्षण, वीजदर कपात, शेतकऱ्यांना मदत आदी विकासकामे करून राजकारणाचे चांगले मॉडेल तयार केले आहे. परंतु मोदी सरकारमध्ये जाती पाती, धर्म, गोमांस, लव जिहाद सारख्या बाबीवरून राजकारण केले जात आहे” असे ते म्हणाले.

पुढे बोलताना संजय सिंह म्हणाले की, “देशाला योग्य दिशा देण्यासाठी लोकसभेत एल्विस सारख्या चांगल्या लोकांची वर्दी लागणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदार हा लोकशाहीचा मालक असतो, यामुळे लोकांनी सर्वांचा विचार करून निवडणुकीत मतदान करावे.” असे म्हणत त्यांनी एल्विस यांना मत देण्यासाठी आवाहन केले.

यावेळी बोलताना संजय सिंह यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकेकाळी खाण व्यवसायात झालेल्या नुकसानी संदर्भात विधान करून ३५ हजार कोटी रुपये वसूल करण्याचे आश्वासन दिले होते. आतापर्यंत साडेतीन रुपयेसुद्धा वसुल करण्यात आले नाहीत” अशी टीका त्यांनी केली.

यावेळी बोलत असताना संजय सिंह यांनी काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. संजय सिंह म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये काळा पैसा देशात आणून लोकांना १५ लाख रुपये देण्याच्या आश्वासनाचेही काही झाले नाही.” असेही ते म्हणाले. याशिवाय, नोटबंदी सारखे प्रकार घडवून देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका दिला असे आरोपही सिंह यांनी केले. यावेळी एल्विस गोम्स, सिद्धार्थ कारापूरकर, प्रदीप पाडगावकर व इतर उपस्थित होते.