‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा दिग्दर्शक आमिर नाही मी होतो; ‘या’ प्रसिध्द दिग्दर्शकाचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्टार अभिनेता अमीर खान याचा एक गाजलेला आणि राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेला चित्रपट म्हणजे ‘तारे जमीन पर’, अमीर खानच्या या चित्रपटाला अनेक चाहत्यांनी दाद दिली आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून अमीर खानची ओळख आहे. तर यावर आता एक खळबळजनक बाब समोर येत आहे. खरं तर ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आमिर खानने नव्हे मी केलं होतं असा दावा प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी केला आहे.

या चित्रपटावरून हा वाद २००७ रोजी घडला होता. मात्र १४ वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा वर आले आहे. तर दिग्दर्शक अमोल गुप्ते म्हणतात, आमिरने अखेरच्या क्षणी मला दिग्दर्शकाच्या खूर्चीतून बाहेर काढलं आणि त्याजागी तो स्वत: बसला असा आरोप त्यांनी केला आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित ‘सायना’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत त्याने आमिर खानसोबत झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, अमोल गुप्ते यांनी ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली होती. या चित्रपटाची पटकथा गुप्तेनेच लिहिली होती. या कथेसाठी त्यांची भरपूर स्तुती करण्यात आली होती. तसेच त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलं होतं. चित्रपटातील सर्वाधिक भाग गुप्ते यांनीच दिग्दर्शित केला होता. मात्र या दरम्यान अमीर खानसोबत अनेकदा वाद झाला होता. दिग्दर्शकपदावरुन काढण्याच्या त्या प्रसंगावर अमोल गुप्ते म्हणाले, या घटनेला आता बराच काळ लोटला आहे आणि त्याचा आता मला काहीच फरक पडत नाही.

सूर्यास्तानंतर नेहमीच सूर्योदय होतो आणि मी भूतकाळात रमत बसणारी व्यक्ती नाही, जी सारखे दुःखाचे कढ उकळत बसेल. आलेला प्रत्येक दिवस बैलासारखा शिंगांवर घेण्यावर मी विश्वास ठेवतो आणि नवीन दिवसात आपल्यासाठी काय आहे, ते पाहतो. मागील १४ वर्षांपासून आपली कला जोपासत चित्रपटसृष्टीत टिकून राहू शकण्याचे हे एकमेव कारण आहे. असे अमोल गुप्ते यांनी म्हटले आहे.