मोठी बातमी : आप, काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाला बहुतांशी वाहिन्यांच्या एक्झिट पोलने दिलासा दिल्यानंतर दिल्ली भाजपा नेत्यांनी आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे. गुरुवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिल्ली भाजपा कार्यकारणीने पक्षाच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याची तयारी केली आहे. आपच्या आमदारांवर जास्तीत जास्त लक्ष ठेवून त्यांना भाजपात सामील करुन घेण्याचा प्रयत्न नेत्यांनी सुरु केला आहे.

भाजपाची दिल्लीतील काँग्रेसचे व आम आदमी पक्षाचे काही नेते, आमदार यांच्यावर नजर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकाल हाती आल्यानंतर दिल्लीतील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे. आम आदमी पक्षाचे जवळपास डझनभर आमदार भाजपाच्या संपर्कात असून निवडणुकीच्या दरम्यानही आपच्या काही आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. पुढील काही दिवसांत काँग्रेसचे माजी मंत्री आणि आपचे आमदार भाजपात प्रवेश करतील असं भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे. भाजपा सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आपच्या 5 आमदारांनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधून भाजपात प्रवेश करण्याची इच्छा दर्शिवली आहे. मात्र, प्रवेश करणाऱ्या आमदारांपैकी प्रत्येकाची येणाऱ्या विधानसभेत भाजपाने उमेदवारीचं तिकीट द्यावं ही अट घातली आहे. आश्वासन देऊन कोणाला पक्षात घेण्याची पक्षाची इच्छा नाही मात्र राजकीय समीकरण पाहून हायकमांड तिकीट देण्याचा निर्णय घेऊ शकतात असं बोललं जातंय.

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणं आहे की, आम आदमी पक्षाच्या आमदारांना पक्षात प्रवेश देऊन भाजपाची तिकीट देण्यास काही हरकत नाही मात्र जर कोणी आम्हाला तिकीट द्याल तर पक्षात प्रवेश करु ही अट ठेवली तर ही अट पक्ष नेतृत्त्व मान्य करणार नाही. कारण भाजपाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दुखविण्यास पक्षाने नकार दर्शिवला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिल्ली राज्यातील राजकारणालाही गती येईल अस चित्र सध्या दिसतंय. दिल्लीत लोकसभेच्या एकूण 7 जागा असून मागील निवडणुकीत या सातही जागा जिंकण्यात भाजपाला यश आलं होतं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like