‘या’ पक्षानं मोदी – शहांसोबत काँग्रेसचं टेन्शन वाढवलं, होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्येच दिली जोरदार धडक

पोलिसनामा ऑनलाईन – गुजरातच्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी झाल्या. तर गुजरातमधील ग्राम पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल काल लागले. या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं दमदार कामगिरी केली. भाजपनं सर्वच्या सर्व ६ महापालिका जिंकल्या. तर ग्रामीण भागातही पहिला क्रमांक कायम राखला. गुजरातच्या ग्रामीण, शहरी भागांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं वर्चस्व राखलं असताना काँग्रेसचा मात्र धुव्वा उडाला. मात्र एका पक्षाच्या यशानं भाजप, काँग्रेसला धक्का दिला आहे.

दरम्यान, एका बाजूला काँग्रेसची धूळधाण उडाली असताना दुसऱ्या बाजूला आपनं थेट मोदी शहांचं होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये धडक दिली आहे. अरविंद केजरीवालांच्या आपनं दिलेली धडक भाजपसाठी धडधड वाढवणारी ठरू शकते. गुजरातमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही आपनं शानदार कामगिरी केली आहे. दिल्लीत सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष (AAP) आता हळूहळू दिल्लीच्या बाहेर विस्तार करू लागला आहे. आप केवळ दिल्लीतच मर्यादित असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. मात्र आता आपनं सीमोल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. आपनं याआधी अनेकदा दिल्लीबाहेर निवडणुका लढवल्या. आधीच्या अनुभवांतून बोध घेत आपनं आपली रणनीती बदलली. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत उतरण्याआधी पक्ष संघटना बळकट करणाऱ्या निवडणुकांकडे पक्षानं लक्ष केंद्रीत केलं. त्याचा परिणाम गुजरातमधल्या महापालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. सूरतसह इतर पालिकांमध्ये आपनं शानदार कामगिरी केली.

केजरीवाल यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी २ लाखांच्या वर मतं घेतली. पण मोदी साडे तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले. निवडणूक लढवल्यावर पक्ष मजबूत होईल, या उद्देशानं आधी आपनं निवडणुका लढवल्या होत्या. मात्र आता पक्ष मजबूत करून मग निवडणूक लढवण्यावर आपचा भर दिसत आहे. दरम्यान, मोदी-शहांच्या गुजरातनंतर आता आपनं योगींच्या उत्तर प्रदेशात धडक देण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आपनं राज्यात पक्षविस्तार सुरू केला आहे. योगी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी आप सोडत नाही. राज्यसभेचे खासदार संजय सिंह, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि खुद्द अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष दिलं आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीही आपनं कंबर कसली आहे.