भाजपा ‘ज्येष्ठ’ नेत्यांचा अपमान करतोय’ : ‘त्या’ मुद्द्यावरून केजरीवालांची टीका

नवी दिल्ली : वृ्त्तसंस्था – लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना तिकीट नाकारून भाजपानं ज्येष्ठांचा अपमान केला आहे. अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. निवडणूक जवळ आली असताना राजकीय पक्षांची एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवाय सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. अशात भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीतून दिग्गज नेत्यांना डच्चू दिला आहे. भाजपाचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे. यावरून विरोधक आता भाजपावर निशाणा साधत आहे.

दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. शिवाय लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं उमेदवारांच्या यादीतून वगळल्यानं केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल म्हणतात की, “लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना तिकीट नाकारून भाजपानं ज्येष्ठांचा अपमान केला आहे. ते हिंदू संस्कृतीच्या विरोधातही आहे.” असे केजरीवाल म्हणाले.

याच ट्विटमध्ये केजरीवाल यांनी भाजपावर आणि मोदींवर नाव न घेता टीका केली. केजरीवाल म्हणाले की, “ज्या ज्येष्ठांनी घर बनवलं त्याच ज्येष्ठांना घरातून बाहेर काढण्यात आले. जो ज्येष्ठांचा होऊ शकत नाही तो आणखी कोणाचा काय होणार ? हीच आहे का भारतीय संस्कृती ?” असे सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत. इतकेच नाही तर, “ज्येष्ठांचा अपमान करा असं हिंदू संस्कृती नाही सांगत. उलट हिंदू संस्कृती शिकवते की, ज्येष्ठांचा आदर सन्मान करायला हवा.” असेही ते म्हणाले.

आमचं सरकारनं दिल्लीत सुशासन स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार त्यामध्ये अडचणी आणत आहे. सीसीटीव्हीसाठी आम्ही गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. परंतु केंद्र सरकारनं तसं होऊ देत नाहीये. अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.