आम आदमीची आता उत्तरप्रदेशकडे ‘आगेकूच’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीने पक्ष विस्ताराचे धोरण आखले आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून उत्तर प्रदेशात महिनाभर सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

लखनौमध्ये येत्या २३ तारखेला आम आदमी पार्टीच्या सभासद नोंदणीला सुरुवात होईल आणि २३ मार्चपर्यंत ही मोहीम राबविली जाईल. पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक घरात, मोहल्ल्यात जाऊन पक्षाचा कार्यक्रम पोहोचवतील. दिल्ली सरकारची कामगिरी प्रत्येक नागरिकापर्यंत जाऊन बिंबवण्यात येईल असे या पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यात अपयश आले अशी टीका सिंह यांनी केली आणि याच मुद्द्यावर आम आदमी पार्टी भर देणार आहे. देशातील मोठ्या राज्यात आम आदमी पार्टी प्रवेश करणार असल्याने अन्य पक्षही आता सावध झाले आहेत.

You might also like