दिल्ली विधानसभा : AAP नं सादर केलं ‘केजरीवालांचं गॅरंटी कार्ड’, केले ‘हे’ 10 वायदे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा अधिकृत जाहीरनामा ‘केजरीवाल यांचे गॅरंटी कार्ड ‘ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर केला. या गॅरंटी कार्डमध्ये १० आश्वासनांचा उल्लेख आहे, ज्यात पाणी, प्रदूषणमुक्त शहर, महिला सुरक्षा, मोफत वीज, भूमिगत केबल, बेकायदा झोपडपट्ट्यांमधील  पायाभूत सुविधा, झोपडपट्ट्यांमधील घरे, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, स्वच्छ दिल्ली आणि प्रत्येक घरात शौचालयांचे आश्वासन दिले आहे.

केजरीवाल म्हणाले की, येत्या पाच वर्षांत दिल्लीतील लोकांना अत्यंत स्वच्छ व चोवीस तास पाणी मिळेल. तसेच २०,००० लिटर मोफत पाण्याची सुविधा सुरू राहील. ते म्हणाले की, दिल्लीत जन्मलेल्या मुलाला बारावीपर्यंतचे शिक्षण विनामुल्य मिळेल. नवीन शाळा उघडल्या जातील आणि यंत्रणा बळकट होईल. तसेच आरोग्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ‘दिल्लीतल्या प्रत्येक कुटूंबासाठी मोफत आणि चांगले उपचार करणे ही आपली हमी आहे. आमच्या सरकारनेही या दिशेने बरीच पावले उचलली आहेत. मोहल्ला आणि पॉली क्लिनिक उघडली जातील.

परिवहन व्यवस्थेबाबत केजरीवाल म्हणाले की, ११,००० पेक्षा जास्त बसेस रस्त्यावर असतील. ५०० किमीपेक्षा जास्त मेट्रो मार्ग बांधला जाईल. तसेच महिलांना देण्यात येणारी मोफत बस सेवा सुरू राहणार आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मोफत वाहतुकीची सुविधाही देऊ. दुरसीकडे प्रदूषणाबाबत केजरीवाल म्हणाले कि, २१ कोटीहून अधिक झाडे लावली जातील. धूळ माती उडू नये, यासाठी व्हॅक्यूम साफसफाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महिलांचे संरक्षणासाठी दीड लाख सीसीटीव्ही बसविण्यात आले असून अजून दीड लाख बसविण्यात येणार आहेत. तसेच जिथे झोपडपट्टी असणाऱ्या ठिकाणी पक्की घरे बांधू आणि त्यांना सर्व मूलभूत सुविधांनी सुसज्ज करून देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले.

दरम्यान, ‘आप’ केजरीवाल गॅरंटी कार्डद्वारे डोर-टू-डोर मोहीम राबवेल आणि गेल्या पाच वर्षात दिल्ली सरकारने केलेल्या कामांचा आढावा लोकांना देण्यात येईल. अरविरंद केजरीवाल यांच्या पक्षाने देशाच्या राजधानीत ३५ लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचा संपूर्ण जाहीरनामा २६ जानेवारीनंतर येणे अपेक्षित आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like