‘कोरोना’संदर्भात सोसायट्यांसाठी मार्गदर्शिका तयार करावी, आम आदमी पार्टीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  सद्यस्थितीत पुण्याबाहेरुन येणाऱ्या लोकांना प्रवेश देण्यासंदर्भात हौसिंग सोसायट्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे ती दूर करण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शिका करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

काही सोसायट्या बाहेरुन येणाऱ्या लोकांकडे पोलीसांचे ना हरकत प्रमाणपत्र मागत आहेत. जर असे प्रमाणपत्र मागीतले तर कारवाई होईल असे पोलीस सांगत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे बाहेरुन येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला तर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करु अशी भिती सोसायटीचे सभासद घालत आहेत. यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. याकरिता पुणे महापालिका प्रशासन, पुणे पोलीस प्रशासन आणि सोसायटीचे पदाधिकारी यांच्या समन्वयाने मार्गदर्शिका करावी. बाहेरुन सोसायटीत येणाऱ्या व्यक्तींसाठी होम क्वारंटाईनची नियमावली आणि आरोग्य विभाग तसेच पोलीसांची जबाबदारी सुनिश्चित करावी. कोरोनाबाबतची भिती दुर करण्यासाठी जनजागृती करावी अशा मागणीचे निवेदन पार्टीच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या निवेदनावर पार्टीचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, डॉ.अभिजित मोरे, श्रीकांत आचार्य , गणेश ढमाले, संदीप सोनवणे, आदींच्या सह्या आहेत.