आरे काॅलनीतील आग लागली नव्हे लावली ; अग्निमशन दलाचा अहवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या आठवड्यात गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील इन्फिनिटी आय टी पार्कच्या जवळच्या जंगलात भीषण आग लागली होती. या आगीचा अग्निशमन दलाचा अहवाल तयार झाला आहे.
बुधवारी अग्निशामक दलाने जाहीर केलेल्या अहवालात आरे कॉलनीतील आग ही जाणीवपूर्वक लावण्यात आली होती. असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणवादी संघटना, येथे राहणारे आसपासचे नागरिक यांनी यापूर्वी केलेल्या आरोपाला एक प्रकारे अग्निशामक दलाच्या या अहवालाने आग लावण्याच्या संशयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आगीच्या अहवालाबाबत काही ठळक मुद्दे 
-आरेच्या जंगलात अनधिकृतरित्या काही लोकांची ये-जा झाली असल्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे.
-तसेच गैरपद्धतीने येथील प्रतिबंधित क्षेत्रात काही माणसांचा वावर झाल्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
-अहवालातील नोंदींनुसार, आग विझल्यानंतर केलेल्या तपासकामादरम्यान आग लागलेल्या ठिकाणी अर्धवट जळालेले टायर्स, बाटल्या, प्लास्टिक आढळून आले.
-डोंगराला लागलेल्या मोठ्या आगीनंतरही तेथील काही भागावर आगीचा कोणताही परिणाम झालेला नव्हता; हे संशय निर्माण करणारे -असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.
याबाबत पोलिसांनी अधिक तपासणी करावी, असेही या अहवालात सुचविण्यात आले आहे.
आग लावल्याची संशयित करणे –
दरवर्षी अशी आग लागते. फरक इतकाच की यंदा ती प्रमाणाबाहेर मोठी झाली आणि सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष गेले. या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे, असा आरोप पर्यावरणवाद्यांकडून याआधीच करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मेट्रो ३ च्या भव्य आरे कारशेडचं कामही याच भागात सुरू असल्याने ही आग लावली गेली असल्याचा आरोपही पर्यावरणवाद्यांनी आणि येथील नागरिकांनी केला होता. त्यामुळे या अहवालानंतर हे सर्व आरोपाने संशयाचा धूर हा अधिक गडद झाला आहे.
आरेच्या जंगलात लागलेल्या आगीचा अहवाल जाहीर झाल्याने अनेक गोष्टी प्रामुख्याने उघड झालेल्या आहेत. हा सगळा ‘नो डेव्हलपमेंट झोन’ (एन डी झेड) होता. हळूहळू तो आय. टी. पार्कसाठी खुला करण्यात आला. आता अजून जागा हवी म्हणून इथे जी झुडपे येतात त्यांना जाळून टाकण्याचा सपाटा लावला आहे. म्हणजे ती मोठी होणारच नाहीत आणि जागा विकासकांसाठी मोकळी करण्यात येईल.
काय आहे प्रकरण –
३ डिसेंबरला गोरेगावातील आरेच्या डोंगराला आग लागली होती. आगीमुळे जवळपास ३-४ किमी पट्ट्यातील झाले जळून खाक झाली होती. ही आग लेव्हल-३ची असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.  इतकेच नाही तर या आगीमुळे दुर्मिळ झाडांसह वन्य प्राणी जिवांचीदेखील हानी झाली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत, जवळपास ७-८ तासांनी ही आग विझवली होती. मात्र जमीन मिळवण्यासाठी जाणुनबुजून ही आग लावण्यात आल्याच आरोप होत आहे. या घटनेनंतर आता पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या ठिकाणाला भेट देऊन दोषींवर कडक कारवाई करणार असे सांगितले होते.