‘आरोग्य सेतू अ‍ॅप सुध्दा देवाची करणीच’, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशाने अनिवार्य करण्यात आलेल्या ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅपची निर्मिती कोणी केली, प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारला देता आले नाही. त्याबाबत माहिती देण्यास असमर्थ ठरलेल्या आणि गुळगुळीत उत्तरे देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान आणि ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ (एनआयसी) यांना केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावरुन आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. आरोग्य सेतू अ‍ॅप ही देवाची करणी आहे, असा चिमटा शिवसेनेने भाजपला काढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप चा उपयोग करावा असे आवाहन केले होते. असे असताना इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान आणि ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ला (एनआयसी) ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप चा निर्माता कोण याची माहिती नसणे अत्यंत धक्कादायक असल्याचे मत समाज माध्यमात व्यक्त करण्यात येत असून, काही जणांनी आता ही गोष्टही देवाची करणी म्हणून कारण सांगून विस्मरणात जाईल, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यस्वस्थेच्या परिस्थितीसाठी अ‍ॅक्ट ऑफ गॉड म्हणजेच देवाची करणी कारणीभूत असल्याचे मत मांडले होते. तोच धागा पकडत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या सुनावणी संदर्भातील बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करत, “या सरकारच्या कामकाजात सर्व काही अ‍ॅक्ट ऑफ गॉडच आहे,” असा टोला लगावला आहे.

तर कर्नाटक युवक काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी सुद्धा ट्विट करत आरोग्य सेतू अ‍ॅप अ‍ॅक्ट ऑफ गॉड आहे, असे म्हटले आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅपचा वाद काय !

आरोग्य सेतू अ‍ॅपची निर्मिती, कोणत्या कायद्याखाली या अ‍ॅपचे संचलन होते आणि या अ‍ॅपद्वारे जमा करण्यात आलेल्या माहितीच्या हाताळणीसाठी स्वतंत्र कायदा करणार आहे का, याबाबतची माहिती देण्याची मागणी सौरव दास यांनी केली होती. पण इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय आणि ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ यांनी आमच्याकडे याबद्दल कोणीतही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगून गुळगुळीत उत्तरे दिली होती. त्यावरुन सौरव दास यांनी माहिती अधिकार कायद्याखाली तक्रार दखल केली.

या प्रकरणावर केंद्रीय माहिती आयोगापुढे सुनावणी झाली. तेव्हा ‘एनआयसी’ने अ‍ॅप बाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे सांगितले. हे अ‍ॅप कोणी तयार केले, संबंधित फाईल्स कुठे आहेत, हे तिथले केंद्रीय माहिती अधिकारी सांगू शकलेले नाहीत, ही मोठी विसंगती असून, याबाबत लेखी माहिती द्या, असे ताशेरे माहिती आयुक्त सरणा यांनी ओढले. तसेच इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय आणि ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

You might also like