द. आफ्रिकेच्या ‘या’ मोठ्या खेळाडूलाही खेळायचा होता वर्ल्डकप, पण …

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग तीन पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेतील वाटचाल अवघड झाली आहे. महत्वाचे खेळाडू जखमी आणि मोठ्या प्रमाणात खराब असलेला खेळाडूंचा फॉर्म हि दक्षिण आफ्रिकेसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे डुबक्या समजल्या जाणाऱ्या बांग्लादेशकडून त्यांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता.

आजवर वर्ल्ड कपमध्ये सलग तीन मॅच पराभूत होण्याची आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे. क्रिकेटप्रेमींना आश्चर्य वाटेल. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डिव्हिलियर्सला आफ्रिकेच्या टीममधून खेळणे शक्य होते. डिव्हिलियर्सने टीम मॅनेजमेंटला तशी ऑफरही दिली होती. पण त्यांनी ती ऑफर धुडकावून लावली. दक्षिण आफ्रिकेची सद्यस्थिती पाहता आता निवड समितीला याचा पश्चाताप होत असणार. मात्र आता काही फायदा नाही.

यावेळी जाहीर केली होती इच्छा

वर्ल्डकप खेळण्याविषयी त्याने अनेकदा आपली इच्छा बोलून देखील दाखवली होती. भारतात एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना देखील त्याने वर्ल्डकप खेळण्याची इच्छा होती, असं स्पष्ट सांगितलं होतं. वर्ल्डकपसाठी जेव्हा संघाची निवड होणार होती तेव्हा त्याने एक दिवस आधी रात्री कॅप्टन फाफ डुप्लेसिस, कोच ओट्टिस गिब्सन आणि टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष लिंडा झोंडी यांच्याशी संपर्क साधला होता. पण, त्याला हे शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता आफ्रिकेने सुवर्णसंधी गमावली कि काय असे क्रीडाविश्वात बोलले जात आहे.