‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड घ्यायला आला नाही एबी डिव्हिलियर्स, कोहलीनं केला धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सोमवारी रात्री खेळलेला आयपीएल २०२० सामना दीर्घकाळ लक्षात राहील. या सामन्यात बंगळुरूच्या टीमने प्रथम फलंदाजी करत २०१ धावा केल्या. मात्र मुंबई इंडियन्सने देखील समान स्कोर केला आणि मॅच टाय झाली. यानंतर सामना ‘सुपर-ओव्हर’ च्या शेवटच्या बॉलपर्यंत गेला आणि विराटच्या टीमने हा सामना जिंकला. सामन्यात प्रत्येक विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला ‘मॅन ऑफ द मॅच’ दिला गेला पण तो अवॉर्ड घ्यायला आला नाही.

या सामन्यात ३६ वर्षीय एबी डिव्हिलियर्सने सर्वत्र चांगली कामगिरी केली. प्रथम तो फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने २४ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या त्यामध्ये ४ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. या तीन सामन्यात त्याचे दुसरे अर्धशतक झाले. यानंतर त्याने संपूर्ण २० ओव्हरची विकेटकीपिंगही केली आणि जेव्हा सामना टाय झाला तेव्हा तो सुपर ओव्हरमध्येही त्याने फलंदाजी केली आणि आपल्या टीमला जिंकवले.

विराटने काय खुलासा केला?
जेव्हा ‘मॅन ऑफ द मॅच’ घ्यायची वेळ आली तेव्हा एबी डिव्हिलियर्स तेथे हजर नव्हता, त्याच्या जागी विराटने अवॉर्ड घेतला. विराटच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण सामन्यात प्रत्येक विभागात सक्रिय राहिल्यानंतर तो दमला होता, त्यामुळे तो ड्रेसिंग रूममध्येच आहे. यानंतर जेव्हा त्याला विचारले गेले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूमध्ये अजूनही इतकी ताकद शिल्लक आहे. यावर विराटने खुलासा करत म्हटले, ‘जर तुम्ही त्याच्याशी (एबी) बोललात तर तो आयुष्याच्या सर्वात सोप्या पद्धती समोर ठेवतो. तो जास्त क्रिकेटही पहात नाहीत. शक्य तेवढे तो क्रिकेटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. उलट त्याला गोल्फ खेळायला आवडते. तो थेट मौदानावर येतो आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून खेळतो. असे खेळाडू फार कमी आहेत. तो संघात नेहमीच मोठे योगदान देतो.

‘सामन्याचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत’
तसेच थरारक विजयानंतर विराट कोहलीने या सामन्याबद्दल बोलताना म्हटले की, ‘माझ्याकडे सामन्याचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत, कारण सामन्यात खूपच चढ-उतार होते. आम्ही खूप चांगली फलंदाजी केली आणि २०० हून अधिक धावा केल्या आणि त्यानंतर आम्ही गोलंदाजीतही चांगली सुरुवात केली. त्यांनी मधल्या ओव्हरमध्ये थोड्या संयमाने कामगिरी केली.’ सुपर ओव्हरमध्ये विजयी चौकार ठोकणारा कोहली म्हणाला, “जसप्रीतशी सामना चांगला झाला. लोकांना अशा प्रकारची मॅच पहायला आवडते. पण आम्हाला अशा सामन्यांमधून धडा घेऊन भविष्यात सामने आणखी चांगले समाप्त करावे लागतील.’

या गोष्टींवर काम करावे लागेल
विराटने पुन्हा एकदा आपल्या संघातील उणीवा कबूल केल्या आणि म्हटले की, ‘फील्डिंग एक असा विभाग आहे, ज्यावर आपण काम करत राहिले पाहिजे.’ आम्ही कॅच सोडले नसते, तर हा सामना इतका जवळ गेला नसता. मी म्हटल्याप्रमाणे आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींचा फायदा घेतला नाही. आम्हाला यावर काम केले पाहिजे.’

महत्वाचे म्हणजे की, या सामन्यात बेंगळुरूकडून चार कॅच सुटले आणि हे सर्व कॅच अखेरच्या ओव्हरमध्ये सुटले. पोलार्डचे तीन कॅच सुटले, ज्याने सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला. या वेळी चहल, गुरकीरत, पवन नेगी आणि देवदत्त पडीक्कल यांनी कॅच सोडले, तर मागील सामन्यात विराट कोहलीनेही दोन कॅच सोडले होते.