दौंडमध्ये भीमा नदीत आढळली शंकराची 1 टन वजनाची पुरातन मूर्ती, आणखी अवशेष सापडण्याची शक्यता

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – येथील भीमा नदी पात्रातील 28 मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ दुस-या रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे खोदकाम सुरु असताना शंकराचे मुख असलेली जवळपास 150 वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती सापडली आहे. मूर्तीचे तोंड पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे. ही पुरातन मूर्ती याच परिसरातील असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आणखी अवशेष सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसरा रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी खोदकाम करताना एका खड्यात ही मूर्ती सापडली. कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला ठेवली आहे स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली आहे. मात्र, मूर्तीचे वजन जास्त असल्याने ही मूर्ती वाहून जाऊ शकली नाही. ही मूर्ती या ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली आहे.मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून याच परिसरात इतर अवशेषही सापडण्याची शक्यता आहे.

याबाबत सेवानिवृत्त पाटबंधारे अभियंता रवींद्र जाधव म्हणाले की, पाण्याचा कितीही मोठा प्रवाह असला तरी 1 टन दगडाच्या वजनाची मूर्ती दूरवरुन वाहत जाऊ शकत नाही. फार तर इकडे तिकडे जवळ अंतरावर या मूर्तीची हालचाल पाण्याच्या प्रवाहामुळे होऊ शकते. गेल्या दोन वर्षात भीमा नदीला जोराचा पाण्याचा प्रवाह असलेला पूर आलेला नाही. त्यामुळे ही पुरातनकालीन मूर्ती या ठिकाणचीच असण्याची शक्यता आहे.