Google Map मुळे 11 वर्षांनी मुलाला भेटले आई-बाबा

इंडोनेशिया : वृत्तसंस्था – गूगलच्या मॅपच्या मदतीने आपल्याला हवे त्या ठिकाणी जाता येते. एखादा रस्ता आपल्याला माहित नसेल तर गुगल मॅपच्या मदतीने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण इंडोनेशिया मधील एका 17 वर्षीय मुलगा याच गुगल मॅपच्या मदतीने तब्बल 11 वर्षांनी आपल्या कुटुंबाला भेटू शकला. इंडोनेशियामधील सेन्ट्रल जावा प्रोव्हिन्समधील स्त्राजेन या गावात ही घटना घडली आहे. Ervan Wahyu Anjasworo असं या मुलाचे नाव असून तो अनाथश्रमात राहत होता.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्याची आजी त्याला लहान असताना एका मार्केटमध्ये घेऊन जात होती. त्याने या मार्केटचा गुगल मॅपवरुन शोध लावला. त्यानंतर या आश्रमाच्या व्यक्तींनी या मुलाचे घर शोधून काढत त्याच्या कुटुंबीयांची आणि त्याची भेट घडवून आणली. आपला मुलगा 11 वर्षांनी घरी आल्यानंतर त्याच्या आई वडिलांचा आनंद गनानत मावत नव्हता. इतकी वर्षे आपल्या मुलाची काळजी घेणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. पाच वर्षाचा असताना या मुलाचे अपहरण करण्यात आले होते.

हा मुलगा व्हिडीओ गेमच्या दुकानातून घरी येत असताना रस्त्यावर डान्स करणाऱ्या एकाने त्याचे अपहरण केल्याची माहिती मिळते. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्याच्याकडून रस्त्यावर डान्स करत भीक मागून घेतली. एके दिवशी रस्त्यावर डान्स करत असताना पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजल्यानंतर अपहरण करणारी व्यक्ती पळून गेली. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याला अनाथश्रमात ठेवलं. तेव्हापासून म्हणजेच नऊ वर्षापासून तो या अनाथश्रमात राहत होता.

दरम्यान, अनाथश्रमात राहत असताना एक दिवस त्याने या मार्केटचा पत्ता गुगल मॅपवरून शोधून काढला. त्या ठिकाणच्या दुकानाचा पत्ता सापडल्यानंतर आश्रमाच्या व्यक्तींनी त्या दुकानदाराशी संपर्क साधला. दुकानदाराला या कुटुंबाविषयी वाचारले असता त्याने या कुटुंबाचा एक फोटो मिळवला. या फोटोमधून त्याने आपल्या कुटुंबाला ओळखल्यानंतर आश्रमाने त्याला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला.