‘या’ सेवा सहकारी सोसायटीत तब्बल सव्वादोन कोटींचा अपहार, सचिव व लिपिका विरुद्ध FIR दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सोसायटीचे सचिव व लिपिकाविरुद्ध अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सचिव सुभाष हौसराव दळवी (रा. अजनूज, ता. श्रीगोंदा), लिपिक ईश्वर पंढरीनाथ गोधडे (रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. शासकीय लेखापरीक्षक द्वारकानाथ जनार्धन राजहंस (वय 64 वर्ष, रा. भिस्तबाग रोड, सावेडी) यांनी ही फिर्याद दिली आहे. 1/ 4 /2018 ते 31 /3/ 2019 दरम्यान 2 कोटी 23 लाख 48 हजार 699 रुपयांचा अपहार झाला.

पेडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेत सचिव व लोकल कर्मचारी असताना त्यांच्या अधिकार व पदाचा दुरुपयोग करून संगनमत करून संस्थेच्या मालकीच्या किमतीच्या रकमेचा अपहार केला. लेखापरीक्षण अहवालात हे स्पष्ट झाले आहे. फौजदारी पात्र न्यास भंग करून संस्थेच्या सभासदांचा संचालकांचा बँकेचा संस्थेचा लेखापरीक्षकाचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने लेखापरीक्षकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/