आमच्या जिंकण्याची खात्री असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला कसा सोडणार?

औरंगाबाद : पोलीसनामा – राज्यात आणि देशात भाजप-शिवसेनेच्या विरोधात वातावरण आहे. आमच्या जिंकण्याची खात्री असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला कसा सोडणार?, असा रोखठोक सवाल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते एका वृत्तपत्राशी बोलत होते.

मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर आणि जिल्हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. आगामी लोकसभा निवडणुक कुठल्याही परिस्थीतीत जिंकायचीच या निर्धाराने मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्याने कार्यकर्त्यांसोबत जीवापाड मेहनत घेतोय, असं सत्तार यांनी सांगितलं.

लोकसभा लढवण्यास इच्छूक असलेल्यांची आमच्याकडे कमतरता नाही. उमेदवारीसाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे ताकदीचा उमेदवार मैदानात उतरवून काँग्रेस ही जागा जिंकू शकते. जनसंघर्ष, एल्गार यात्रेच्या माध्यमातून आम्ही गावागावात आताच्या सरकारबद्दल असलेला संताप पाहिला आहे. त्याचे परिवर्तन मतांमध्ये करू शकलो तर काँग्रेस औरंगाबाद लोकसभेत इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस इच्छूकांची एक यादी आम्ही काँग्रेसच्या संसदीय समितीला पाठवणार आहोत. त्यावर २६ तारखेला आमच्या पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी अंतिम निर्णय घेतील. राहिला प्रश्‍न राष्ट्रवादीने या जागेवर दावा सांगण्याचा तर त्यात काही गैर नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून काँग्रेसचा उमेदवार सतत पराभूत होत आहे. या पार्श्‍वभूमीवर २०१९ मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडा अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.