… तर बच्चू कडू यांनी सरकारमधून बाहेर पडावं, शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यानं दिला ‘खोचक’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर केलेल्या टीकेमुळे सरकारमधील अनेक नेते त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते. राज्य सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली होती. त्यावर राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडू यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याचं वाटत असेल त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे त्यांनी म्हंटले आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, या कर्जमाफीचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील 80 टक्के शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच ही कर्जमाफीअंतिम नसून, हा पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसा – जसा पैसा येईल तस – तसे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि कर्जमाफीबद्दल निर्णय घेतले जाणार आहे. मात्र असे असूनही, जर बच्चू कडू याना सरकारची कर्जमाफी बुजगावणं वाटत असेल तर, त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा खोचक सल्ला सत्तार यांनी दिला.

दरम्यान, आळंदी येथे झालेल्या वारकऱ्यांच्या कार्यक्रमानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य करताना ते म्हणाले कि, सरकारच्या धोरणांमुळे जे शेतकऱ्याच नुकसान झालं आहे ते अगणित आहे. त्याचा आपण अंकात विचार करू शकत नाही. तसेच माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहेत, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली होती.