‘फडणवीस अन् दानवेंनी माझ्यावर 58 चौकशा लावल्या, माजी मुख्यमंत्र्यांनी आता ‘दूध का दूध’साठी तयार राहावं’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेती पिकांचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी झालेल्या परिसराचा पाहणी दौरा करण्यासाठी राज्यातील अनेक नेते बांधावर पोहचले आहे. अतिवृष्टीवरून राज्यातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

जलयुक्त शिवार योजनेत कुठलीही दडपशाही होत नाही. उलट विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच दडपशाही केली होती. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर 58 चौकशा लावल्या होत्या. पण आम्ही घाबरलो नाही. आता फडणवीसांनीही दूध का दूध, पाणी का पाणीसाठी तयार असलं पाहिजे, असा घणाघात सत्तार यांनी केला आहे.

सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले फडणवीस यांनी राज्यात फिरण्यापेक्षा मोदींकडे जाऊन बसावे आणि आमचे हक्काचे जीएसटीचे (GST) पैसे द्यायला सांगावे. त्यामुळे आम्हाला तातडीने शेतकऱ्यांना मदत करता येईल, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

सत्तार पुढे म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) देशाचे नेते आहेत. शेतकऱ्यांवर कोणतही संकट येतं तेव्हा ते भेटीला धावून जातात सरकारला मदत करायला सांगतात. सरकारला दिशा देतात. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यांना गुरु मानतात. मोदींचे गुरु सध्या दुष्काळात फिरत आहेत. त्यामुळे फडणवीस बाहेर निघाले, असा दावा त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, एकही शेतकरी आर्थिक मतदीपासून सुटणार नाही आणि जर सुटला तर तहसीलदारापासून खालच्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.