‘अब्दुल सत्तार ‘गद्दार’, त्यांना ‘मातोश्रीची’ पायरी चढू देऊ नका’, चंद्रकांत खैरेंचा ‘हल्लाबोल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे नाराज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी हल्लाबोल केला आहे. अब्दुल सत्तार गद्दार आहेत त्यांच्यामुळेच आज शिवसेनेचा पराभव झाला आहे त्यांना पवित्र मातोश्रीची पायरी चढू देऊ नये असंही ते म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “ज्यांनी बंडखोरी केली त्यांना हाकलून देण्यात आलं. त्यांना घरी जावं लागलं आहे. बंडखोरी करणाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया करून कारवाई करू. आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तारांच्या गटाचं मतदान झालचं नाही. त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही.”

पढे बोलताना ते म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं की, मी मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंसमोर फेकला. त्याच्यानंतर अध्यक्षांनाही मी माझा आमदारकीचा राजीनामा पाठवला असं आमच्यासमोर त्यांनी सांगितलं. ते अतिशय उद्धटपणे बोलत होते. मी शिवसेनेचा नेता या नात्यानं समजावला आलो होतो परंतु ते जोरात बोलू लागले. यावेळी सगळेच नेते होते. अब्दुल सत्तार गद्दार आहे. अशा गद्दारांना पक्षात राहण्याचाही अधिकार नाही. अब्दुल सत्तार आता भाजपमध्ये गेले आहेत तर रहा म्हणावं भाजपमध्येच. मंत्री असतानाही ते 6 लोक घेऊन का गेले. तुमची ताकद असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा.”

चंद्रकांत खैरे म्हणाले, “मी साहेबांना सांगून त्यांच्यावर कारवाई करायला लावणार आहे. आमच्या शिवसेनेमनुळेच ते निवडून आले. आमची कष्टानं बांधलेली संघटना आहे. आज झालेल्या पराभवालाही अब्दुल सत्तार जबाबदार आहे. या गद्दाराला मातोश्रीची पायरी चढू देऊ नका. मी उद्धव ठाकरेंना सांगून सत्तारांवर कारवाई करायला सांगणार आहे. माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. परंतु मी म्हणतो अब्दुल सत्तार गद्दार आहेत.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/