मंदी सदृश्य वातावरण ; मात्र होवू नका ‘हतबल’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात मंदी सदृश्य वातावरण असले तरी नागरीकांनी घाबरून जावू नये. सध्या भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या संक्रमण पर्वातून वाटचाल करीत आहे. वाहन निर्मिती, वाहनाचे सुटे निर्मिती, बांधकाम उद्योग या क्षेत्रावर मंदीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे. येत्या नजीकच्या काळात परिस्थिती सुधारेल यामुळे नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा सूर मान्यवरांनी काढला आहे.

रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने आयोजित केलेल्या शिशिर व्याख्यानमालेत “आर्थिक मंदी व उपाययोजना” या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. या परिसंवादात अर्थतज्ञ अभय टिळक, मराठा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरलचे माजी सरसंचालक अनंत सरदेशमुख, किशोर पंपचे संचालक उद्योजक किशोर देसाई, संजय खानोलकर हे मान्यवर सहभागी झाले होते. व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, सचिव प्रवीण गुणवरे आदी उपस्थित होते.

यावेळी अभय टिळक म्हणाले की, मंदी कमी करण्यासाठी सरकार योग्य दिशेने उपाययोजना करीत आहे. मात्र याचा परिणाम त्वरित दिसून येणार नाही. आपण मंदीजवळ देखील नाही आणि देशात मंदी प्रमाण खूपच आहे, असे सध्या समाजात दोन टोकाचे विचार करणारा वर्ग निर्माण झाला आहे. मंदीचे वारे गेली १२ वर्षांपासून फिरत आहे. जागतिक बाजारपेठेत भारताचे फक्त २% स्थान आहे. यासह मंदीला बरीच कारणे आहेत.

सरदेशमुख म्हणाले की, सध्या रिसेशन कि स्लो डाउन आहे हे अद्याप धूसर आहे. पगार कपात झाल्यास मंदी येत आहे असे. पगारवाढ कमी झाल्यास स्लो डाउन समजायचे. मात्र कृषी क्षेत्रात उत्पन्न घटले त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक खुंटली, परिणामी खूपच समस्या वाढल्या. नोकरी दर फक्त २:१% इतका आहे. असे नकारात्मक चित्र सध्या दिसत आहे.

किशोर देसाई म्हणाले कि, उद्योजकांसाठी मंदी म्हणजे गुंतवणूकीची संधी आहे. कोणतेही सरकार असो उद्योगक्षेत्राच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. मात्र उलट महसुलीच्या दृष्टीने उद्योगक्षेत्र सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजतात. सरकारने औद्योगिक क्षेत्राकडे लक्ष दिल्यास मंदी कायमस्वरूपी हद्दपार होईल असा विश्वास व्यक्त केला.

संजय खानोलकर म्हणाले की, उद्योगात नवनिर्मिती, कौशल्यपूर्णता, नैपुण्यता आणली पाहिजे. उद्योगाना शासकीय मदत मिळाली पाहिजे. तसेच मंदीमुळे नफा कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा कुलकर्णी यांनी तर आभार यशवंत महाले यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/