काय सांगता ! होय, ‘अवलिया’ राज्यातील 288 विधानसभा आणि साताऱ्यातील पोटनिवडणूक लढविणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा लढवणार ! इतकेच नाही तर सातारा लोकसभा पोटनिवडणूकही लढणार असल्याचं बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी याबाबत सांगितलं. ‘अखिल बहुजन समाज सेना पक्षातर्फे आपण निडवणूक लढवणार आहोत’ असं बिचुकले यांनी सांगितलं. आपण महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा लढविणार असून निवडणूक लढण्यास इच्छुक कार्यकर्त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

‘हा विकास झाला का ?’
पत्रकार परिषदेत बोलताना बिचुकले म्हणाले, “भ्रष्ट प्रशासनास धडा शिकवण्यास चांगला मुख्यमंत्री हवा. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर शर्ट बदलून जॅकेट वापरायला लागले. हा बदल आहे का ? हा विकास झाला का ? मला लोकांनी मोठं केलं आहे. लोकांनी मला डोक्यावर घेतलं आहे.” असेही ते म्हणाले.

‘शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याआधी इतके दिवस हे झोपले होते का ?’
यावेळी बोलताना बिचुकले यांनी शरद पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरही भाष्य केलं. बिचुकले म्हणाले, “मला बिग बॉसचं नाही, समाजातल्या प्रश्नांचं कौतुक आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याआधी इतके दिवस हे झोपले होते का ? आताच का गुन्हा दाखल करत आहात ? 10 वर्ष काय केलं ? महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यात पवारांचे प्रयत्न आहेत.” असेही त्यांनी म्हटले.

Visit : policenama.com