Bigg Boss फेम अभिजीत बिचुकले नाव मतदार यादीतून ‘गायब’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी मंगळवारी (दि. 1) मतदान प्रक्रीया सुरु आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना मतदानाआधीच धक्का बसला आहे. बिचुकले यांचे मतदार यादीतून नावच गायब झाले आहे. यामुळे बिचुकले यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुणे पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. मतदार यादीत बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांचे नाव होते. पण त्यांच्या नावाखाली अभिजीत यांचे नाव नसून नारायण बिचुकले असे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते. हे पाहून अभिजीत बिचुकले यांना राग अनावर झाला. त्यांनी बूथवरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

बिचुकले मतदानापासून वंचित
मी उमेदवार असून माझे नाव यादीत नाही, तर सर्वसामान्याचे काय? कोणीही येऊन इथे मतदान करेल. सर्व आपले बंधूभाव आहेत. मी कधीही जातीवर राजकारण केले नाही. यांनी स्वत:ची नाव लिहीली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोच नाव आहे. पण माझे नाही. मी उमेदवार आहे. त्यामुळे मला मतदानापासून आता वंचित राहावे लागणार आहे. हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे. निवडणूक आयोग अशाच प्रकारे जर काम करणार असेल तर सगळ अवघड असल्याचे बिचुकले म्हणाले.

भाजपवर फोडले खापर
अभिजीत बिचुकले यांनी यावेळी या सगळ्याच भाजपवर खापर फोडले आहे. निवडणूक आयोग नेमका कशा फॉलोअप घेत होते याची मला माहिती नाही. पण यात काहीतरी षडयंत्र आहे. उमेदवाराचे नाव नसणे हा भोंगळ कारभार नाही का? यामागे कोणता पक्ष आहे, हे शोधले पाहिजे, भाजपने या सगळ्या याद्या बनवल्या आहेत, असा थेट आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.