PMRDA च्या महानगर नियोजनकारपदी अभिराज गिरकर, विवेक खरवडकर स्वगृही पुणे मनपाच्या सेवेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) महानगर नियोजनकार पदी नगर रचना विभागाचे सह संचालक अभिराज गिरकर यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे या पदावर मागील चार वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असलेले महापालिकेचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांना सेवामुक्त करण्यात आले असून लवकरच ते पुणे महापालिकेतील आपल्या मूळ विभागात रुजू होतील.

भाजप- शिवसेना युती शासनाच्या काळात पुणे शहर व परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली. पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर युती शासनाने एप्रिल २०१६ मध्ये महापालिकेतील मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांची पीएमआरडीएच्या मुख्य अभियंतापदी प्रतिनियुक्तीवर बदली केली. अल्पावधीतच त्यांना पीएमआरडीएच्या महानगर नियोजनकार पदी नियुक्त करण्यात आले. या कालावधीत पीएमआरडीएच्या सुमारे ७०० चौ. कि.मी. हून अधिक परिसरातील बांधकाम परवानग्या, टीपी स्किम, तसेच पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्याची संधी त्यांना मिळाली.

दरम्यान, तीन महिन्यांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता परिवर्तन होवून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. दरम्यान नगर रचना विभागाचे सह संचालक अभिराज गिरकर यांची सप्टेंबर २०१९ मध्ये पदोन्नती झाली. पदोन्नतीनंतर नगर रचना विभागात त्यांच्यासह पद रिक्त नसल्याने ते आतापर्यंत पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. यामुळे नव्याने सत्तेत आलेल्या राज्य शासनाने पीएमआरडीए चे महानगर नियोजनकार हे पद नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाच्या सह संचालक किंवा उप संचालक दर्जाच्या अधिकार्‍यांमधून प्रतिनियुक्तीने भरता येईल, असा बदल करून अभिराज गिरकर यांची महानगर नियोजनकार पदावर नियुक्ती केली. त्याचवेळी खरवडकर यांची महानगर नियोजनकार पदावरील सेवा खंडीत करून त्यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत पाठविण्यात आले आहेत.