पिंपरी : चारित्र्यावर संशय घेत केलेल्या जबर मारहाणीत पत्नीचा गर्भपात, पतीसह तिघांवर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्यावर संशय घेत पत्नीला केलेल्या जबर मारहाणीत तिचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वेताळनगर येथे सप्टेंबर 2020 ते 3 मार्च 2021 दरम्यान ही घटना घडली.

या प्रकरणी पीडित विवाहितेने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, लग्नात तुझ्या घरच्यांनी आमचा मान-सन्मान केला नाही, असे म्हणून आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. आरोपी पती हा 12 फेब्रुवारी 2021 रोजी एका महिलेला सोबत घेऊन घरी आला. त्यास फिर्यादी विवाहितेने घरात घेण्यास विरोध केला. त्यावरून आरोपीने फिर्यादीला मारहाण केली. तसेच आरोपी सासू व नणंद यांनी शिवीगाळ केली. आरोपी पतीने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तुझ्या पोटातील बाळ माझे नाही, असे म्हणून फिर्यादीच्या पोटावर जोरात लाथ मारली. तू जर आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली तर तुला व तुझ्या घरच्यांना पाहून घेईन, अशी धमकी पतीने फिर्यादीला दिली. फिर्यादी गर्भवती असल्याचे माहीत असतानाही आरोपीने मारहाण केल्याने गर्भपात झाला असे फिर्यादीत नमूद केले आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.