मधुमेह रूग्णांपैकी जवळजवळ 30% रुग्णांना भविष्यात मूत्रपिंडाच्या समस्या

पुणे : मधुमेह रूग्णांना नंतरच्या आयुष्यात मूत्रपिंडाचा त्रास होण्याची शक्यता असते. मूत्रपिंडाच्या काही समस्या क्रोनिक किडनी डिसीज(सीकेडी) ची चिन्हे दर्शविणारी असू शकतात ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी मूत्रपिंड निरोगी होण्यासाठी नियमित चाचण्या करणे आवश्यक आहे.

बहुतेक लोक मूत्रपिंडाच्या समस्येसह जगतात आणि त्यांना त्याबद्दल माहिती नसते. “मूत्रात रक्त, मुतखडा, मूत्रपिंडात तीव्र इजा, मूत्रपिंडात वेदना आणि संसर्ग आणि मूत्रात प्रथिने असणे हे मूत्रपिंडाचा आजार होण्याची संभाव्य चिन्हे आहेत. इतर लक्षणांमध्ये थकवा, खाज सुटणे, मूत्र उत्पादन कमी होणे, ओटीपोटात वेदना, मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग (यूटीआय), भूक न लागणे, पायांना सूज येणे यासारखे लक्षण असू शकतात. किडनीच्या समस्या मधुमेहाशी संबंधित आहेत आणि मधुमेहाच्या रूग्णांमध्ये सामान्यत: आढळतात,असे डॉ. संजय इंगळे, पॅथॉलॉजिस्ट व झोनल टेक्निकल हेड वेस्ट इंडिया, अपोलो डायग्नोस्टिक्स, पुणे यांनी सांगितले.

डॉ इंगळे पुढे सांगतात, मधुमेह झालेल्या जवळजवळ ३० टक्के रुग्णांना मूत्रपिंडाचा त्रास होतो. सहसा, मधुमेहाचे निदान झाल्यानंतर रुग्णांना 5-10 वर्षानंतर मूत्रपिंडातील समस्या उद्भवतात. मायक्रोआल्बमिन आणि मायक्रोआलबमिन क्रिएटिनिन रेशोचे नियमित निरीक्षण करणे मूत्रपिंड निकामी होण्यापासून बचाव करते. नव्याने निदान झालेल्या मधुमेहाच्या रुग्णांनी या चाचणी आवश्यक केल्या पाहिजे. परंतु, वृद्ध रुग्ण देखील ही चाचणी घेऊ शकतात. या चाचण्यांद्वारे मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये लवकर होणारे बदल सूचित होतात. साखरेची पातळी आणि रक्तदाबावर देखरेख ठेवणे, इष्टतम वजन राखणे, आहारात मीठाचे सेवन कमी करणे, निरोगी आहार घेणे, धूम्रपान आणि मद्यपान कमी करणे, दररोज व्यायाम करणे आणि तणावमुक्त राहणे यासारख्या उपायांचा अवलंब केला गेला पाहिजे.