‘आरे’ मधील पुर्नरोपण केलेले ६१ % वृक्ष मृत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – मुंबईत मेट्रो कारशेड बनविण्यासाठी आरे या सरंक्षित क्षेत्रातील २ हजार वृक्षांची तोड करण्यात आली होती. त्यापैकी निम्म्याहून अधिक वृक्षांचे पुर्नरोपण (ट्रान्सप्लांट) केल्याचा दावा मेट्रोने केला होता. मात्र, याची काही पर्यावरण प्रेमींनी पाहणी केली. त्यात मेट्रोने पुर्नरोपण केलेल्या झाडांपैकी ६१ टक्के वृक्ष देखरेख न केल्याने मृत झाले असल्याचे लक्षात आले आहे.

कुलाबा ते अंधेरी दरम्यानच्या मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरेच्या जंगलात कारशेड उभरण्यात येत आहे. या कारशेडसाठी सुमारे अडीच हजाराहून अधिक झाडे कापण्याची परवानगी महापालिकेने मेट्रोला दिली होती. न्यायालयाने त्यावरील स्थगिती उठविल्यानंतर मेट्रोने दोन रात्रीत १५०० झाडे कापली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने वृक्षतोडीला स्थगिती दिली होती.

मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तोडलेल्या १५०० झाडांपैकी १ हजार ६६ झाडांचे पुर्नरोपण केल्याचा दावा केला होता. त्यापैकी ६८४ झाडे सुकून गेली आहेत. पुर्नरोपण केल्यानंतर त्यांची देखरेख न करणे, मोठ्या झाडांच्या लगतच पुर्नरोपण करणे अशा विविध कारणामुळे ही झाडे सुकून गेली आहेत.

मुंबई हायकोर्टाने इंस्पेक्शन कमिटी बनविली आहे. या कमिटीच्या सदस्यांसमवेत कार्यकर्ते जोरु भथेना हे गेले होते. त्यांनी या पुर्नरोपण केलेल्या झाडांची पाहणी केल्यानंतर हा दावा केला आहे. याप्रकरणी १६ डिसेंबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यावेळी याबाबतची नेमकी परिस्थिती समोर येणार आहे.

Visit : Policenama.com