काय सांगता ! होय, राज्यातील 86 % रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये 86 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 4 हजार 751 चाचण्यांमधील हे सर्वेक्षण असून याव्यतिरिक्त कोरोना ची लागण झालेले आणि लक्षणे नसलेल्या अनेक व्यक्ती समाजात संसर्गाचा प्रसार करत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्यात करोनाबाधित 180 रुग्णांची तपशीलवार माहिती अहवालात आहे. त्यात 155 रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे यातील कोणतीही लक्षणे अजून दिसून आलेली नाहीत. केवळ 22 रुग्णांना ही लक्षणे आढळलेली आहेत. एकूण रुग्णांमधील जवळपास 130 हून अधिक रुग्ण हे 21 ते 50 वयोगटातील आहेत. 155 जणांच्या शरीरात विषाणूने प्रवेश केला असला तरी सक्षम प्रतिकारशक्तीमुळे शरीरात संरक्षण प्रतिद्रव्ये (अण्टीबॉडी) तयार होतात. ही विषाणूचा सामना करत असल्याने त्यांच्या शरीरावर विशेष परिणाम दिसून आलेले नाहीत, हे यावरून स्पष्ट होते. 86 टक्के जणांमध्ये लक्षणे दिसत नाहीत आणि रुग्णांची वाढती संख्या यावरून अनेक जणांमध्ये विषाणू कार्यरत आहे असे नाकारता येत नाही. अशी लक्षणे नसलेल्या आणि बाधित व्यक्ती विषाणूचा प्रसार करत आहेत, हे वास्तव असल्याचे फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी सांगितले.

कोरोना बाधितांच्या संपर्कात येणारे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार इत्यादी विकारांचे रुग्ण या जोखमीच्या गटातील व्यक्तींमध्ये संसर्ग प्रसार होत आहे . एक व्यक्ती चार जणांना प्रसार करतो असे उदाहरण घेतले तर चार जण 16 जणांना, 16 जण 256 जणांना आणि 256 चे 1024 असा संसर्ग फैलावत जातो. परंतु जर एका व्यक्तीने दोघांना, त्यांच्याकडून चार जणांना, चाराचे आठ, आठाचे 16 आणि 16 जणांकडून 32 जणांना लागण होते. आता 1 हजार 24 पर्यंत प्रसार होण्यापेक्षा 32 जणांना झाली तर नियंत्रण सोपे आहे. म्हणूनच टाळेबंदी पाळण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचे मत हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी मांडले.