घ्या ! आता पुण्याचा मद्यविक्रीत दुसरा क्रमांक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

देशात शैक्षणिक, आय टी क्षेत्रात अग्रेसर असलेले पुणे आता आणखी एका गोष्टीत राज्यात दुसरे असल्याचे समोर आले आहे. राज्यात मद्यविक्रीमध्ये औरंगाबाद विभागाने आघाडी घेत पहिले स्थान पटकाविले आहे, तर दुसऱ्या स्थानावर पुणे विभाग आहे. या दोन्ही शहरांमध्ये मद्यविक्रीचे कारखाने आहेत, तर मुंबईत फक्त किरकोळ विक्री होत असल्याने ही दोन्ही शहरे मद्यविक्रीत आघाडीवर  गेली आहेत.पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्याबरोबरच नगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यांपैकी पुणे जिल्ह्यात सुमारे एक हजार ६७४ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली आहे. ‘या दोन्ही शहरांमध्ये मद्यविक्रीचे कारखाने आहेत. त्यामुळे विक्री जास्त होऊन उत्पादन शुल्क हे सर्वाधिक मिळाले आहे.’ असे उपअधीक्षक सुनील फुलपगार यांनी सांगितले.

याबाबत , राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीतून मिळालेल्या महसुलाचा आढावा घेतला . त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सुमारे १३ हजार ४४८ कोटी रुपयांचा महसूलराज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे. त्यामध्ये औरंगाबाद, पुणे आणि ठाणे विभागातून सर्वाधिक महसूल गोळा झाला आहे. मद्यविक्रीतून औरंगाबाद विभागातून सुमारे चार हजार २२८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यानंतर पुणे विभागामध्ये सुमारे तीन हजार १२ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली आहे. ठाणे विभागातून सुमारे दोन हजार ३६५ कोटी रुपये जमा झाले आहेत. नाशिक विभागातून सुमारे एक हजार ९३५ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्याबरोबरच नगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यांपैकी पुणे जिल्ह्यात सुमारे एक हजार ६७४ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली आहे. त्यानंतर नगर जिल्ह्यात सुमारे एक हजार २५४ कोटी रुपये, तर सोलापूरमध्ये सुमारे ८३ कोटी रुपयांचे मद्य विकण्यात आले आहे. पुणे विभागात गेल्यावर्षी सुमारे दोन हजार ८१० कोटी रुपये महसूल मिळाला होता. पहिल्यांदाच पुणे विभागाने तीन हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासह जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीही हा विभाग प्रथम स्थानावर होता. गेल्या वर्षी सुमारे तीन हजार ९७८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता.ठाणे विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड हे जिल्हे आहेत. या विभागाद्वारे सुमारे दोन हजार ३६५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी सुमारे दोन हजार १४० कोटी रुपये महसूल मिळाला होता,’ असे उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.नाशिक चौथ्या स्थानावर आहे. या विभागामध्ये नाशिक जिल्ह्याबरोबरच धुळे, नंदूरबार आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा विभाग मद्यविक्रीतून महसूल मिळविण्यात चौथ्या स्थानावर आहे. यावर्षी सुमारे एक हजार ९३५ कोटी रुपये महसूल मिळाला असून, गेल्यावर्षी सुमारे एक हजार ६९५ कोटी रुपये महसूल जमा झाला होता.उर्वरित विभागांपैकी कोल्हापूर विभागातून सुमारे एक हजार १३१ कोटी रुपये, तर नागपूर विभागात सुमारे ७७४ कोटी रुपयांची विक्री झाली आहे.